नव्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक महत्वाच्या गोष्टींमध्ये मोठे बदल होऊ घातले आहेत. सगळ्याच बदलांची अंमलबजावणी तातडीने होणार नसली तरी आगामी महिन्यातील काही निर्णयांमुळे तुम्हाला आर्थिक नियोजनाचा नव्याने विचार करायची गरज भासू शकते. जुलै महिन्यात टॅक्स, बँकिंग, सिलेंडरचे दरात बदल होण्याची शक्यता आहे.
येत्या 1 जुलैपासून एसबीआय बँकेतून पैसे काढताना विचार करावा लागणार आहे. तसेच धनादेशाचा वापर करण्यासाठीही तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागतील. बँकेतून एका महिन्यात चारपेक्षा जास्तवेळा पैसे काढल्यास शुल्क भरावे लागेल. यामध्ये एटीएममधून काढण्यात येणाऱ्या पैशांचाही समावेश आहे. चारपेक्षा जास्तवेळा पैसे काढल्यास प्रत्येक व्यवहारावर 15 रुपये आणि जीएसटी असे शुल्क अदा करावे लागेल. बचत खात्यासाठी सेवा कर भरावा लागेल.
काही दिवसांपूर्वीच सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेत विलिनीकरण झाले होते. त्यामुळे आता बँकेच्या व्यवहारात मोठे बदल होणार आहे. परिणामी सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. कॅनरा बँकेने सिंडिंकेट बँकेचा IFSC कोड बदलला असून नवा कोड 1 जुलैपासून वापरात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला जुन्या चेकबुकचा वापर करून व्यवहार करायचे असल्यास फक्त दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यानंतर सिंडिकेट बँकेचे चेकबुक हे निरुपयोगी ठरेल.
गेल्या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न न भरणाऱ्यांना 1 जुलैपासून जादा TDS, TCS कर भरावा लागणार आहे. वार्षिक टीडीएस 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असणाऱ्यांना हा नियम लागू होईल.
पेट्रोल आणि डिझेलपाठोपाठ आता घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून जुलै महिन्यात यासंदर्भातील निर्णय घेतला जाऊ शकतो.
काही महिन्यांपूर्वी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमुळे लांबवणीवर पडलेल्या अल्पबचत योजनांवरील (Small Saving Schemes) व्याजदर कपातीच्या निर्णयाची मोदी सरकारकडून आता अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. मात्र, आता मोदी सरकार 1 जुलैपासून अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपात करू शकते. गेल्यावर्षी केंद्र सरकारकडून बँकांमधील मुदत ठेव योजनांवरील व्याजदर कमी करण्यात आले होते. त्यानंतर आता अल्पबचत योजनांवरील व्याजदर घटल्यास सामान्य गुंतवणुकदारांच्या चिंता वाढणार आहेत.