अलीकडच्या काळात पारपंरिक चलनाला पर्याय म्हणून क्रिप्टोकरन्सीचा (Cryptocurrency) वापर झपाट्याने वाढताना दिसत आहे. सुरुवातीला मर्यादित लोकांपुरती मर्यादित असलेली ही बाजारपेठ आता जगातील सर्वच देशांमध्ये विस्तारत आहे. त्यामुळे साहजिकच या क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर रोजगार उपलब्ध झाले आहेत. कोरोना संकटामुळे रोजगारावर गंडांतर आलेल्या तरुणांना यामुळे चांगली संधी चालून आली आहे.
क्रिप्टोकरन्सीच्या भारतातील बाजारपेठेत या तंत्रज्ञानाची माहिती असलेल्यांसाठी 10 हजार नोकऱ्या उपलब्ध आहेत. Xpheno या कंपनीच्या माहितीनुसार, मुंबई, गुरुग्राम आणि नोएडात क्रिप्टोकरन्सी तंत्रज्ञानाची जाण असलेल्या तब्बल 6 हजार तज्ज्ञांची गरज आहे. यासाठी संबंधित कंपन्या तगडा पगारही द्यायला तयार आहेत.
याशिवाय, मशीन लर्निंग, सिक्युरिटी इंजिनिअर, रिपल एक्स डेव्हलपर्स, फ्रंट अँड बॅक एंड डेव्हलपर्स या पदांसाठीही कंपन्यांना उमेदवारांची मोठ्याप्रमाणावर गरज आहे. RippleX हा एकप्रकारचे डिजिटल व्यवहारांसाठीचे व्यासपीठ आहे. या माध्यमातून क्रिप्टोकरन्शी डेव्हलपर्स आणि युजर्स एकमेकांशी जोडले जातात. या माध्यमातून कोणत्याही नेटवर्कवर आणि कोणत्याही चलनात पैसे स्वीकारले आणि पाठवले जाऊ शकतात.
क्रिप्टोकरन्सीच्या बाजारपेठेत तंत्रज्ञांना नोकऱ्यांची लाखो रुपयांची पॅकेजेस मिळत आहेत. तुम्हाला संबंधित विषयाचे चांगले ज्ञान असेल तर साधारण 12 ते 15 लाखांचे वार्षिक सॅलरी पॅकेज मिळेल. अधिक अनुभवी लोकांना वर्षाला अगदी 70 ते 80 लाख इतकाही पगार मिळू शकतो. Xpheno च्या माहितीनुसार, ब्लॉकचेन स्पेशालिस्ट म्हणून तुमच्याकडे दोन ते पाच वर्षांचा अनुभव असला तरी तुम्हाला वर्षाला सहजपणे 13 ते 30 लाखांचे पॅकेज मिळेल.
पाच ते आठ वर्षाचा अनुभव असणाऱ्यांना 30 ते 50 लाख आणि या क्षेत्रातील 8 ते 12 वर्षांचा अनुभव असणाऱ्या तंत्रज्ञांना 50 ते 75 लाखांचे पॅकेज मिळू शकते. तर सिक्युरिटी इंजिनिअर म्हणूनही या क्षेत्रात तुमच्या अनुभवानुसार 10 लाख ते 50 लाखांपर्यंत पगार मिळू शकतो. याशिवाय, फ्रंट एंड डेव्हलपर्स आणि डिझायनिंगचे ज्ञान असलेल्यांनाही क्रिप्टोकरन्सीच्या बाजारपेठेत रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत.
क्रिप्टोकरन्सीच्या क्षेत्रातील रोजगारांसाठी सायबर सिक्युरिटी एक्स्पर्टस, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, AWS, PHP, जावा, पायथन आणि डेटा स्ट्रक्चर या विषयांतील ज्ञान असणे जरुरीचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये क्रिप्टोकरन्सीची बाजारपेठे झपाट्याने विस्तारली आहे. अगदी Amazon आणि Apple सारख्या बलाढ्य कंपन्यांनी क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक आणि व्यवहार करण्याचे इरादे जाहीर केल्याने आगामी काळात या क्षेत्राची आणखी भरभराट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरुवातीला गुंतवणूकदारांच्या मनात क्रिप्टोकरन्सीविषयी असलेले संशयाचे मळभही दूर झाले आहे. CoinDCX ही भारतातील पहिली क्रिप्टोकरन्सी युनिकॉर्न आहे. या कंपनीकडून सध्या तंत्रज्ञांची भरती केली जात आहे.