आज दि.२ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं घर अति महत्त्वाचे ठिकाण जाहीर, पोलिसांचा घराला पहारा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्विकारल्यानंतर आता त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानावर आता अधिक सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान अति महत्वाचे ठिकाण म्हणून घोषित केले आहे.शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद गाठले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे हे कामाला लागले आहे. अजूनही एकनाथ शिंदे हे गोव्यातच  आहे. बंडखोर आमदारांची बैठक घेण्यात आली आहे. त्यानंतर सर्व आमदारांना घेऊन ते मुंबई पोहोचणार आहे.

शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्याहून मुंबईला रवाना

शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्याहून आता मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. गोव्याच्या ताज हॉटेलमधून आज दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास त्यांची बस विमानतळाच्या दिशेला रवाना झाली होती. त्यानंतर ते विमानतळात दाखल झाले. या सर्व आमदारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आहेत. सर्व आमदार विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर ते विमानात बसले आणि मुंबईच्या दिशेला रवाना झाले. पुढच्या दोन तासात हे सर्व आमदार मुंबईत दाखल झाले.

एकनाथ शिंदे आता शिवसेनेचे नेते नाही, उद्धव ठाकरेंचं पत्र खरं, संजय राऊतांनी केला खुलासा

एकनाथ शिंदे यांच्यावर पक्षाची शिस्तभंगाची कारवाई झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख यांच्या सहीने ही कारवाई झाली आहे. आता ते शिवसेनेचे नेते नाही. उद्धव ठाकरे यांनी आपल्या अधिकारानुसार कारवाई केली आहे, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्या पत्राबद्दल स्पष्ट खुलासा केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडीची चौकशी आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी केल्याच्या पत्राबद्दलही खुलासा केला आहे.

नागपूर : पोलीस कारवाईतून वाचल्याच्या आनंदात हवेत गोळीबार; चौघांची थेट तुरुंगात रवानगी

पोलिसांच्या कारवाईतून वाचल्याचा आणि आपला रेती ट्रान्सपोर्टचा ट्रक पोलिसांच्या तावडीतून परत मिळाल्याचा आनंद साजरा करणाऱ्या चौघांनी असं काही केलं की त्यांची थेट तुरुंगात रवानगी झाली. या घटनेत चौघांनी रस्त्याच्या कडेल आपली कार उभा करत तिथेच नाचण्यास सुरुवात केली. यानंतर यातील एकाने आनंदाच्या भरात आपल्याजवळील रिवॉल्वरमधून हवेत दोन राऊंड फायर केले. गोळ्यांच्या आवाजामुळे परिसरातील नागरिक घाबरले आणि तिथे दहशतीचं वातावरण निर्माण झालं.

पुराव्यासाठी कोर्टात आणलेल्या बॉम्बचा ब्लास्ट, परिसर हादरलं; अनेक पोलीस गंभीर जखमी

बिहारमधील पाटना स्थित सिविल कोर्ट परिसरात बॉम्ब ब्लास्ट झाला आहे. जखमी पोलिसांमध्ये एका कॉन्स्टेबलचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमकुआन पोलीस स्टेशनच्या पोलिसांकडून स्फोटके जप्त करण्यात आली होती. ही स्फोटकं कोर्टात दाखवण्यासाठी दिवाणी न्यायालयात आणण्यात आली होती.न्यायालयाच्या आवारातील एका खोलीत ही स्फोटके ठेवण्यात आली होती. काही वेळातच खोलीत ठेवलेल्या स्फोटकाचा अचानक स्फोट झाला. मोठा आवाज होऊन चार पोलीस स्फोटाच्या झटक्यात आले. जखमींना पीएमसीएचमध्ये पाठवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

तब्बल 24 वर्षांनी आव्हाडांना क्लिन चिट, 350 रुपयांची लाच घेतल्याचा होता ठपका

नाशिकजवळील येवला येथे दामू आव्हाड पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना 1988 साली एका प्रकरणात 350 रुपयाची लाच घेतल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली होती. 1998 साली कनिष्ठ न्यायालने त्यांना दोषी ठरवून एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्याचा निकाल लागला आहे यामध्ये आव्हाड यांना क्लिन चिट देण्यात आली आहे. यामुळे तब्बल 24 वर्षांनी न्याय मिळाला आहे.

सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स कोर्सचे अगदी मोफत प्रशिक्षण

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत  गरजू आणि होतकरू तरुणांसाठी केंद्र सरकार तर्फे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. जे विद्यार्थी प्रवेश शुल्क भरू शकत नाहीत. ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत मोफत प्रशिक्षण दिले जात. या योजनेअंतर्गत नाशिक शहरातील उत्कर्ष ट्रेनिंग सेंटरमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक्स कोर्स’ मोफत शिकविला जाणर आहे. तुम्हाला जर या कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा असेल तर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.  

महाराष्ट्रातील सत्तापालटानंतर भाजपाचं पुढील लक्ष्य निश्चित, हैदराबादमध्ये ठरणार रणनीती

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ करून अखेर भारतीय जनता पक्ष सत्तेत आला आहे. भाजपने ‘मिशन लोटस’ हे महाराष्ट्रातही अगदी यशस्वीपणे राबवल्याचं म्हटलं जात आहे. महाराष्ट्र काबीज केल्यानंतर आता भाजपने दाक्षिण भारतामधील राज्यांवर फोकस करण्याचं निश्चित केलं आहे.  भाजपाच्या याच रणनीतीचा भाग म्हणून तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादमध्ये तब्बल 18 वर्षांनी भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आजपासून (शनिवार) या बैठकीला सुरुवात होईल. या दोन दिवसीय बैठकीमध्ये राज्यात भाजपची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.

निकालाचं काऊंटडाऊन सुरु; येत्या आठवड्यात जाहीर होणार CBSE बोर्डाचा निकाल?

राज्य मंडळाने 10 वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले आणि पुढच्या वर्गातल्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. परंतु ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन’ने अद्याप निकाल जाहीर केले नाहीत. सीबीएसईकडून लवकरच इयत्ता 10वी आणि 12वीच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या जाणं अपेक्षित आहे. सीबीएसई बोर्डाकडून 10वी आणि 12वीचे निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. 35 लाखांहून अधिक विद्यार्थी त्यांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकत्याच आलेल्या अपडेटनुसार, CBSE इयत्ता 10वीचे निकाल  4 जुलैच्या आसपास आणि इयत्ता 12वीचे निकाल 10 जुलैच्या आसपास जाहीर करील अशी अपेक्षा आहे; मात्र बोर्डाने अजून कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही.

सरकारने सोन्यावरील आयात शुल्क वाढवलं

सोन्याच्या दरात चढउतार होत असतात. गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यानंतर रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम सोन्याच्या आयातीवर झाल्याने दरवाढ झाली होती. सोन्याचे वाढते दर थोडे कमी होतील, अशी अपेक्षा असताना आता सरकारने सोन्याच्या आयातीवरील कस्टम ड्युटी वाढवली आहे. त्यामुळे सोन्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीचा विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार ठरला, शेवटच्या क्षणी नावाची घोषणा

महविकास आघाडीच्यावतीने राजन साळवी यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. अवघे काही मिनीटे राहिले असताना शिवसेनेचे कोकणातील सामान्य कुटुंबातील निवडून आलेले आमदार राजन साळवी यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार चेतन विठ्ठल तुपे हे सुचक तर काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हे अनुमोदक झाले आहेत. परंतु काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवत महाविकास आघाडीकडून शिवसेनेला संधी देत राजन साळवी यांचा अर्ज दाखल केला आहे.

मंत्रालयात 70,000 रुपये पगाराची नोकरी आणि बऱ्याच सुविधा; ही घ्या लिंक

अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, भारत सरकार इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मानकीकरण विभाग, संशोधन विश्लेषण, व्यवस्थापन प्रणाली प्रमाणन विभाग या विभागांमधील पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 असणार आहे.या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Tech/B.E. किंवा मेटलर्जिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.bis.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

भीषण भूस्खलनात 24 जणांचा मृत्यू तर 38 जण अजूनही बेपत्ता

मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. यात मृतांची संख्या शनिवारी 24 वर पोहोचली आहे. यामध्ये टेरिटोरियल आर्मीच्या 18 जवानांचा समावेश आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने गुवाहाटीतील लष्कराच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने सांगितलं की, अद्याप 38 लोक बेपत्ता आहेत. मदत आणि बचाव कार्याला गती देण्यासाठी आणखी काही पथकं तैनात करण्यात आली आहेत.

SD Social Media

9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.