कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मार्च 2020 पासून शाळा बंद आहेत. शालेय फीचा प्रश्न गेल्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. शाळांच्या फीचा प्रश्न सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला होता. कोरोना संकटातही शाळांनी वाढवलेल्या फीच्या मुद्यावरुन पालक आणि शाळांमध्ये गोंधळ सुरूच आहे. नाशिक येथील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल मध्ये देखील पालक फी कमी करण्याच्या मागणीवर आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
नाशिक येथील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल मध्ये देखील पालकांनी फी कमी करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल सर्वच पालक शाळेबाहेर जमल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. शाळेने फी मध्ये 50 टक्के सवलत देण्याची मागणी पालकांच्या वतीनं करण्यात आली आहे. पालकांच्या गोंधळानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये आज बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होणार हे पाहावं लागणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं यापूर्वीही खासगी शाळेच्या फी वसूलीबाबत जीआर काढला होते. मुलांना राईट टू एज्युकेशनचा हक्क आहे. विद्यार्थ्यांना त्यामळे शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. भविष्यात एखाद्या शाळेची तक्रार आली तर निश्चित कारवाई होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे येत्या काळात शाळा सुरू होणार नाहीत, असे संकेत वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.