भाजपचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करून बाळासाहेब थोरात यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली होती. पडळकरांच्या टीकेला बाळासाहेब थोरात यांची लेक शरयू देशमुख यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांच्या भाषेवरुन त्यांच्या संस्काराची ओळख होते, असं म्हणत वडिलांवरच्या टीकेला शरयू देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
माझ्या हातात सूत्र द्या, ओबीसींची गेलेलं आरक्षण मिळवून देतो, नाहीतर राजकारणातून संन्यास घेतो, असं वक्तव्य फडणवीस म्हणाले होते. त्यावर बोलताना थोरात यांनी फडणवीसांना त्यांच्या जुन्या वाद्याची आठवण करुन देत वेगळा विदर्भ झाल्याशिवाय आपण लग्न करणार नव्हतात, त्याचं काय झालं? असा सवाल केला होता. हाच सवाल पडळकरांच्या जिव्हारी लागला.
थोरात यांच्या टीकेनंतर लागलीच पडळकर यांनी ट्विट करुन थोरातांवर हल्ला चढवला. ‘महसूल मंत्रीपदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्र फडणवीसांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे, याचेही भान यांना राहिले नाही.’ अशी टीका त्यांनी केली.