ठाकरे पवारांची 22 दिवसात दुसरी भेट, राऊतांचे ‘नरेंद्रभाई’

राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय. एकीकडे अनिल देशमुखांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलाय. तर दुसरीकडे शरद पवारच नाराज असल्याची चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर पवार थेट वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये गेल्या 22 दिवसांनंतर ही दुसरी भेट आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पंतप्रधानांना भेटायला गेले होते. त्याअगोदर 7 जूनला पवार आणि ठाकरेंची वर्षावर 1 तास चर्चा झाली. मात्र पुन्हा राजकीय वर्तुळात शिवसेना ही भाजपच्या जवळ जात असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्याचं कारण होतं उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची विशेष भेट. या बातम्यानंतर ऑपरेशन गुप्त कमळच्या बातम्या आल्या. आणि त्यानंतर मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला.

याच दरम्यान पवारही नाराज असल्याची चर्चा सुरु झाली होती. याच बातम्यांमागे कारण होतं. शनिवारी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंमध्ये 2 तास झालेली चर्चा, सोमवारी पुन्हा राऊत उद्धव ठाकरेंमध्ये दीड तास चर्चा झाली. याच चर्चेनंतर राऊतांनी पवारांना मुख्यमंत्र्यांचा निरोप पोहोचवला. या घडामोडी कशासाठी घडल्या ? त्याचं उत्तर मंगळवारी मिळालंय. कारण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचले…आणि 22 दिवसांनी या दोन बड्या नेत्यांमध्ये बैठक झाली…स्पष्ट आहे ज्या तऱ्हेने राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पवारांना भेटले. त्यावरुन ही बैठक घडवून आणली ती राऊतांनीच…संजय राऊतांनीच मध्यस्थीची भूमिका निभावल्याची चर्चा आहे.

मविआत अस्वस्थतेची कारणे..

  1. भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पवारांची अहमदाबादमध्ये भेट झाल्याची चर्चा होती.
    शाहांनी या भेटीवर अधिक बोलणं टाळलं पण मीडियावर भेट नाकारली नाही
  2. काही दिवसांआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली
  3. यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जवळीक वाढत असल्याचं बोललं जात होतं
  4. या भेटीगाठीवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत शंकेचं वातावरण निर्माण झालं होतं आणि पवार-उद्धव
    ठाकरेमधल्या भेटीगाठीही थांबल्या होत्या
  5. तसंच महाविकास आघाडीतल्या कुरबूरीवरुनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा होती
  6. त्याचबरोबर मविआतल्या नेत्यांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरु आहे.
  7. अनिल देशमुखांना ईडीकडून समन्सही गेलेत, त्यावरुनही चर्चा झाल्याची माहिती आहे.

या सर्व घडामोडींवरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये भेट घडवण्याचं काम राऊतांनी केल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे ही भेट होण्याच्या काही तास आधीच मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये झालेल्या भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असंही राऊतांनी म्हटलं होतं. पण मोदी हे अजूनही ठाकरेंसाठी ‘नरेंद्रभाई’ आहेत हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.