जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाय योजना राबविण्यात येत असून नागरीकांच्या लसीकरणावरही भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 38 हजार 778 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 1 लाख 46 हजार 581 लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण 6 लाख 85 हजार 359 लाभार्थ्यांना कोरोनाची लस देण्यात आल्याची माहिती दिली आहे.
जिल्ह्यात 16 जानेवारी, 2021 रोजी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला होता. शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या सत्रात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरु केले. त्यानंतर 5 फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 45 वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते. 1 एप्रिलपासून जिल्ह्यातील 45 वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही खाजगी रुग्णालयातूनही नागरीकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तर 1 मे ते 11 मेपर्यंत जिल्ह्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरीकांचेही लसीकरण करण्यात आले. त्यानंतर 21 जूनपासून जिल्ह्यातील 18 वर्षापुढील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे.
कोरोना लसीकरणास नागरीकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांचे सहज व सुलभ लसीकरण व्हावे याकरीता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र कार्यरत करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 38 हजार 778 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 1 लाख 46 हजार 581 लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण 6 लाख 85 हजार 359 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहे. पैकी सर्वाधिक 2 लाख 35 हजार 747 लसीकरणाचे डोस हे प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आले आहे तर 49 हजार 275 लाभार्थ्यांचे लसीकरण प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची सुविधा असलेल्या खाजगी रुग्णालयामार्फत करण्यात आले असून जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात 8 हजार 73 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस तर 2 हजार 137 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आल्याचेही या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.