जम्मू-काश्मीरच्या अमरनाथमध्ये आज पुन्हा मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली होती. पण ती बातमी खोटी असल्याचं जम्मू-काश्मीर पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. अमरनाथमध्ये आज पुन्हा ढगफुटी झाली, असा दावा करणारा एक व्हिडीओ समोर आला होता. अनेक माध्यमांनी संबंधित व्हिडीओ दाखवत अमरनाथमध्ये पुन्हा ढगफुटी झाल्याची माहिती दिली होती. पण संबंधित व्हिडीओ हा आजचा नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान सोशल मीडियावर आज व्हायरल होणारा व्हिडीओ हा अतिशय थरारक असा आहे. या व्हिडीओत भारतीय सैन्यातील जवानांची धावपळ दिसत आहे. संबंधित व्हिडीओत पाणी डोंगरावरुन प्रचंड वेगाने वाहताना दिसत आहे. पाणी आपल्या प्रावाहासोबत दरड देखील घेवून जाताना दिसत आहे. या पाण्यात मोठमोठी दगडं आहेत. अतिशय चित्तथरारक असा हा व्हिडीओ आहे. भारतीय सैन्याचे जवान समोरच्या डोंगरावरुन पाण्याच्या प्रवाहाचा आवाज ऐकताच सतर्क होतात आणि डोंगराखाली असलेल्या टेंटना खाली करण्याचा इशारा देतात. संबंधित व्हिडीओत ज्या काही हालचाली आणि बोलणं ऐकू येतंय त्यात याबाबतची माहिती मिळत आहे. पण हा व्हिडीओ आजचा नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
आपल्या आयुष्यात आपण एकदातरी अमरनाथची यात्रा करावी, असं म्हटलं जातं. अमरनाथची यात्रा केल्याने आपल्याला पुण्य मिळतं असं मानलं जातं. त्यामुळे हजारो भाविक दरवर्षी जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या अमरनाथमध्ये महादेवाच्या दर्शनासाठी जातात. मात्र अमरनाथच्या यात्रेला गेलेल्या तब्बल 10 ते 15 हजार भाविकांवर गेल्या महिन्यात मोठं संकट कोसळलं होतं. अमरनाथमध्ये होली गुहेजवळ अचानक मोठा पाऊस झाला. खरंतर ही ढगफुटीच होती. या ढगफुटीमुळे गुहेजवळ पाण्याच्या प्रवाहाने अक्षरश: हाहाकार माजवला होता. या घटनेत आतापर्यंत अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 10 ते 15 हजार भाविक प्रभावित झाले आहेत.