‘उद्धव ठाकरेंना मराठा नेतृत्व संपवायचंय’, रामदास कदमांचे खळबळजनक आरोप

उद्धव ठाकरे यांना मराठा नेतृत्व मोठं होऊ द्यायचं नाही, त्यांना मराठा नेतृत्व संपवायचं आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. हा आरोप करताना रामदास कदम यांनी स्वत:सह नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांची उदाहरणं दिली आहेत. तसंच उद्धव ठाकरेंना आज आपण शिवसेना पक्षप्रमुख म्हणून नाही तर माजी उपमुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देत आहोत. आज ते शरद पवारांच्या मांडीवर बसून राजकारण करत आहेत. बाळासाहेबांच्या विचाराचं राजकारण केलं असतं, तर मी त्यांना शिवसेना पक्षप्रमुख म्हणून शुभेच्छा दिल्या असत्या, असंही रामदास कदम म्हणाले.

‘उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांवर चालण्याऐवजी शरद पवारांच्या विचारावर चालत आहेत. उद्धव ठाकरेंना मराठा नेतृत्वाला मोठं होऊ द्यायचं नाही, त्यांना संपवायचं आहे का? असा संशय मला येत आहे. मग मी असो, राणे असोत किंवा एकनाथ शिंदे. माझ्या तोंडाला 3 वर्ष कुलूप लावण्यात आलं. बोलू दिलं नाही, भाषण करू दिलं नाही,’ अशी प्रतिक्रियाही कदम यांनी दिली.

रुग्णालयात असताना कट

सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी आपण हॉस्पिटलमध्ये आजारी असताना सरकार पाडण्याचा कट रचल्याचा आरोप केला. या आरोपांनाही रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मला उदय सामंत यांनी सांगितेली घटना भयानक आहे. उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये असताना रामदास कदम आणि योगेश कदम यांना संपवण्यासाठी सहा मिटींग झाल्या. या मिटींगला आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, अनिल परब, विनायक राऊत उपस्थित होते. अशापद्धतीने तुम्ही आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही आम्हाला नाही तर शिवसेनेलाच संपवत आहात,’ असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं.

‘तुम्ही आजारी होतात, पण आदित्य ठाकरे तर आजारी नव्हते ना? आता यात्रा निघत आहेत, मातोश्रीचे दरवाजेही उघडे झाले आहेत. हे आधीच झालं असतं, तर ही वेळ आली नसती,’ असा टोलाही रामदास कदम यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.