कोरोना महामारीचा धोका कमी होत असल्यानं राज्यात आता सर्व काही सुरळीत होताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाकाळात लावण्यात आलेले निर्बंध हळू हळू शिथील करताना दिसत आहेत. 29 जुलै रोजी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला होता. 25 जिल्ह्यांना लावण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात आले होते. त्यानंतर 10 दिवसांनी आता पुन्हा सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक पार पडली.
सोमवारी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर उर्वरित 11 जिल्ह्यांना दिलासा मिळेल, अशी शक्यता होती. तर मंदिरं उघडण्याची मागणी होत असल्यानं मंदिरं सुरू होतील, अशी अपेक्षा होती.
तसेच रेस्टाॅरंट आणि माॅल देखील सुरू करण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती. मात्र टास्क फोर्सच्या बैठकीनंतर कोणतीही घोषणा करण्यात आली नसल्यानं आता नागरिकांना दिलासा मिळाला नसल्याचं दिसून येत आहे.
संभाव्य तिसरी लाट, ऑक्सिजनची लागणारी गरज, लसीकरणाचा वेग वाढवणे, ट्रेसिंग, ट्रॅकिंग वाढवणे, तसेच आगामी काळात आणखीही काही क्षेत्रांच्या बाबतीत सावधानता बाळगून निर्बंधात शिथिलता आणणे, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्ससोबत चर्चा केल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितलं आहे. त्यात मंदिर, रेस्टाॅरंट आणि माॅल उघडण्याबाबतचा उल्लेख करण्यात आला नाही.
दरम्यान, येत्या 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावेळी काही क्षेत्रात लावण्यात आलेली शिथीलता कमी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. परंतु, आता कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य धोक्याची गंभीरता लक्षात घेता सध्या तरी राज्य सरकार निर्बंध कमी करण्याच्या तयारीत नसल्याचं दिसून येतंय.