आपल्यापैकी प्रत्येकाला किमान एकदा तरी शाळेत जायला उशीर झाला असावा. शाळेत लेट गेल्यावर शिक्षक आपल्याला वर्गाबाहेर उभं करणं, ओणवं उभं करणं, काठीचा मार देणं किंवा काहीतरी अभ्यासासंबंधी शिक्षा देतात. पण सध्या अशा शिक्षेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून सर्वांना धक्का बसला आहे. शाळेत लेट आलेल्या विद्यार्थ्यांना टॉयलेट स्वच्छ करण्याची शिक्षा केली आहे.
कर्नाटकच्या गडग जिल्ह्यातील शाळेतील ही घटना. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. नागवीतील सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील हा धक्कादायक प्रकार यामुळे उघडकीस आला.
व्हिडीओत पाहू शकता या विद्यार्थीनी शाळेच्या गणवेशात टॉयलेटजवळ आहे. कुणी हातात बादली धरली आहे, कुणी पाणी आणून देतं आहे, कुणी हातात झाडू घेऊन आहे. एक मुलगी टॉयलेटच्या आत आहे, जिला इतर मुली मदत करत आहेत. सर्व जणी मिळून टॉयलेट साफ करत आहेत.
सहावी-सातवीतील हे विद्यार्थी आहेत. @KeypadGuerilla ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार शाळा प्रशासनाने त्यांना शाळेत वेळेत न आल्याने शिक्षा म्हणून शौचालय साफ करायला लावलं, असा आरोप पालकांनी केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार स्वयंपाकीने हे दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं. ज्याचा व्हिडीओ व्हॉट्सअॕपवर शेअर केला. त्यानंतर तो इतर सोशल मीडियावरही व्हायरल होतो आहे. व्हिडीओ व्हायरल होताच संताप व्यक्त केला जातो आहे. संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान गडगमधील शिक्षा विभागाने या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले आहेत.