राज्य महिला आयोगाच्या रिक्त पदांवर
सहा सदस्यांची नियुक्ती
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली असली तरी आयोगाचे सदस्यपद अद्याप रिक्त होते. या रिक्त पदांवर सहा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या आमदार दीपिका संजय चव्हाण, शिवसेना आमदार प्रकाश फातर्पेकर यांची कन्या नगरसेविका सुप्रदा फातर्पेकर, राष्ट्रवादीच्या आभा विजयकुमार पांडे, ॲड. संगीता चव्हाण, समाजसेविका ॲड. गौरी नारायणदास छाब्रीया आणि काँग्रेसचे जेष्ठ दिवंगत नेते दादासाहेब रुपवते यांची कन्या समाजसेविका उत्कर्षा रुपवते यांची सदस्यपदी नियुक्ती कऱण्यात आली आहे.
काँग्रेस , राष्ट्रवादीने समजूतदारपणा दाखवला
असता तर भाजपाचा पराभव झाला असता
सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “काँग्रेस आणि राष्ट्रवादीने समजूतदारपणा दाखवला असता तर भाजपाचा पराभव करणं शक्य होतं. आकडेवारी तेच दाखवत आहे. अशी त्रुटी राहणार नाही पुढच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना काळजी घेईल”. दरम्यान जयंत पाटील यांनी पक्षात आणखी काही प्रवेश होणार असल्याचं सांगितलं आहे.
गूगलचे कार्यालय आता
पुण्यात सुरु करण्यात येणार
आता गूगलचे कार्यालय पुण्यात पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. कारण Google कडून लवकरच पुण्यात नवीन ऑफिस सुरु करण्यात येणार आहे. गूगलने सोमवारी पुण्यात या वर्षी नवीन कार्यालय उघडण्याची घोषणा केली आहे.सध्या अनेक आघाडीच्या परदेशी कंपन्या भारतात आकर्षित होत आहेत. मोठ्या कंपन्या भारतात आपल्या कंपनीची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना जॉब देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यात गूगलची (Google) भर पडली आहे.
वाघाचा दोन जणांवर हल्ला
नागपूर जिल्ह्यातील चोर बावली परिसरात वाघाने दोन जणांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये पती-पत्नी दोघंही जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हल्ला करणारा वाघ जखमी अवस्थेत होता. पती-पत्नी लघुशंकेसाठी थांबले असताना त्यांच्यावर वाघाने हल्ला केला आहे. जखमी वाघाच्या हल्ल्यात महिलेच्या पायाला तर तिच्या पतीच्या हाताला दुखापत झाली. हल्ल्यात दोघे बचावले असून शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघंही मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथील रहिवासी आहेत.
बिहारमध्ये विद्यार्थी आक्रमक
दगडफेक करत ट्रेनला लावली आग
बिहारमध्ये सलग तिसऱ्या दिवशी गोंधळाची स्थिती कायम आहे. भारतीय रेल्वेच्या आरआरबी एनटीपीसी आणि ग्रुप डी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप करत विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी परीक्षा घोटाळ्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाठीचार्जचाही आरोप केलाय. गयामध्ये उद्रेक झालेल्या तरूणांनी प्रजासत्ताक दिनी दगडफेक करत ट्रेनला आग लावल्याचीही घटना घडली.
केवळच हिंदीच नाही तर कोणत्याही
भाषेविरोधात नाही : स्टॅलिन
आपल्याला आजही आपल्या राज्यांच्या भाषांचा सन्मान करुन त्यांना राष्ट्रीय स्तरावरील भाषा म्हणून ओळख मिळवून देण्याबद्दचे कायदे बदलण्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागतोय,” अशी खंत स्टॅलिन यांनी व्यक्त केलीय. मातृभाषा बोलणारे संकुचित विचारसणीचे असतात हा चुकीचा समज आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. “आपण तमीळ बोलत असल्याने आपण संकुचित विचारसणीचे आहोत असा त्याचा अर्थ होता नाही. केवळच हिंदीच नाही तर आम्ही कोणत्याही भाषेविरोधात नाही,” असंही स्टॅलिन यांनी स्पष्ट केलं.
नंदुरबारचे तापमान
5 डिग्री सेल्सियसच्या खाली
राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानात घट झाली आहे. उत्तर भारतातील हवामानाची स्थिती आणि पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधून येणाऱ्या धुळीच्या वादळामुळं राज्यात थंडीचं वातावरण आहे. मुंबई, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भात थंडीची लाट पसरलीय. मुंबईत पारा 16 अंशावर पोहोचला आहे. नाशिकच्या निफाडमध्ये पारा 4.5 वर पोहोचला आहे. तर, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी थंडीची लाट कायम आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात तापमान 5 अंश सेल्सिअस खाली आहे.
राज्यातील महाविद्यालयं
1 फेब्रुवारी पासून सुरू होणार
राज्यातील महाविद्यालयं 1 फेब्रुवारी पासून सुरू होणार अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. करोनाच्या नियमाचे (Corona) पालन करून महाविद्यालय सुरू होणार असल्याचे नवे आदेश काढण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, हे विचारात घेऊन राज्यातल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, सोमवारपासून राज्यातल्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जिथे रुग्णसंख्या कमी आहे, तिथे खबरदारी घेऊन परवानगी देण्यात आली आहे.
SD Social Media
9850 60 35 90