सोशल मीडियात आक्षेपार्ह व्हिडीओ आणि भडकावू मेसेज व्हायरल करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा मेसेज किंवा व्हिडीओमुळे काहींच्या भावना दुखावतात. त्यातून वातावरण कलूषित बनत असल्याच्या वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता सोशल मीडियात साईट्सकडून यासंदर्भातील तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जात आहे. यात फेसबुकने आघाडी घेतली आहे. फेसबुक इंडिया या भारतातील अतिशय लोकप्रिय सोशल मीडिया साइटवर देशात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. त्यावर सोशल मीडिया कंपनी मेटाने जानेवारी महिन्यात एक कोटीहून अधिक कंटेंट पीसवर कारवाई केली आहे.
मेटा कंपनीने जारी केलेल्या निवेदनात माहिती
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, या कारवाईची माहिती देत मेटा कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. त्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने 11.6 दशलक्ष कंटेट पोस्टवर कारवाई केली आहे. संबंधित पोस्टमधून फेसबुकच्या नियम आणि नियमांच्या 13 श्रेणींचे उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले आहे. यात भडकावू भाषण, गुंडगिरी, छळ, मुलांचे जीव धोक्यात घालणे, धोकादायक संस्था आणि व्यक्ती, अश्लीलता आणि लैंगिक घडामोडींशी संबंधित तक्रारींचा समावेश आहे. भडकावू भाषणे, आत्महत्या, आत्मघातकी कृत्य तसेच हिंसक सामग्रीविरोधात देखील पावले उचलली गेली आहेत. आयटी नियमांतर्गत फेसबुक इंडियाच्या मासिक अहवालात या कारवाईची माहिती देण्यात आली आहे.
1 ते 31 जानेवारीदरम्यान फेसबुकने 11.6 कोटींहून अधिक सामग्रीवर कारवाई केली आहे. याच कालावधीत इंस्टाग्रामने 32 लाखांहून अधिक सामग्रीवर कारवाईचे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भडकावू भाषण, खोट्या बातम्या, चुकीची माहिती यासारख्या बाबींवर तीव्र आक्षेप घेण्यात येत आहे. याप्रकरणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला जबाबदार धरण्याची मागणी सातत्याने होत आहे. याचदरम्यान फेसबुकने स्वतःच कारवाईचा बडगा उगारला आहे.
आयटी नियमांनुसार, 5 दशलक्षांहून अधिक वापरकर्ते असलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मला ठराविक कालावधीत अनुपालन (नियमांचे पालन केल्यासंदर्भात) अहवाल प्रकाशित करावा लागतो. यामध्ये तक्रारींचा तपशील आणि त्यावर केलेल्या कारवाईचा समावेश आहे. त्यानुसारच नियमाचे पालन करीत फेसबुकने आपल्या अहवालातून कारवाईचा आणि दखल घेतलेल्या तक्रारींचा तपशील जाहीर केला आहे