आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी उद्योजक होऊन रोजगार निर्माण करा, एमएसएमई मंत्रालय संपूर्ण सहकार्य करेल – केंद्रीय एमएसएमई मंत्री राणे

दोन वर्षात महाराष्ट्रात 37  एमएसएमई क्लस्टर उभारणार

आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी उद्योजक होऊन रोजगार निर्माण करा असे आवाहन करत यासाठी  सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय संपूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही केंद्रीय सूक्ष्म, लघु  आणि माध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली.

महाराष्ट्र दिनानिमित्त सूक्ष्म, लघू,  मध्यम उद्योग मंत्रालय तसेच सूक्ष्म, लघू आणि  मध्यम उद्योग विकास संस्था, “झेप उद्योगिनी” आणि “वी एमएसएमई” च्या सहकार्याने 1 मे ते  3 मे दरम्यान मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर  येथे `महाराष्ट्र एमएसएमई एक्सपो 2022’ हे  तीन दिवसीय व्यावसायिक प्रदर्शन आयोजित करण्यात  आले आहे,   नारायण राणे यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

देशाच्या एकूण निर्यातीपैकी एमएसएमई क्षेत्राच्या  निर्यातीचा वाटा  50 टक्के आहे तर आर्थिक वृद्धीत या क्षेत्राचे योगदान 30 टक्के आहे, मात्र  हे पुरेसे नाही या दोन्ही ठिकाणी हे क्षेत्र पहिल्या क्रमांकावर असावे  यासाठी मंत्रालयाचे निरंतर प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. आर्थिक क्षमता वाढवण्यासाठी उद्योगांकडे वळण्याचा सल्ला त्यांनी दिला. नागरिकांनी  केवळ उद्योगाचे प्रस्ताव घेऊन यावे,उद्योगांच्या प्रगतीसाठी एमएसएमई मंत्रालयाचे सहकार्य कायमच राहील असे राणे यांनी सांगितले.देशाच्या विकासात मुंबई आणि महाराष्ट्राचे  मोठे योगदान असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.  येत्या दोन वर्षात एमएसएमई अंतर्गत महाराष्ट्रात 37  क्लस्टर  उभे करणार असल्याची माहिती देत त्यांनी महाराष्ट्रात उद्योगवाढीसाठी उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्याची गरज  व्यक्त केली.

त्यापूर्वी नारायण राणे यांनी या प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेटी देऊन व्यावसायिकांशी संवाद साधला.  राणे  यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र एमएसएमई अचिव्हर्स’ या नियतकालिकाचे प्रकाशन देखील करण्यात आले.

या कार्यक्रमाला जागतिक व्यापार केंद्राच्या कार्यकारी संचालक रूपा नाईक, एमएसएमई  महाराष्ट् संस्थेचे संचालक प्रशांत पार्लेवार, दुबईस्थित पेशवा हॉटेलचे व्यवस्थापकीय संचालक सचिन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते

जास्तीत जास्त महिलांना उद्योजक बनण्यासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने आवश्यक सहकार्य करावे अशी विनंती जागतिक व्यापार केंद्राच्या कार्यकारी संचालक रूपा नाईक यांनी यावेळी केली.

मुंबईत साकीनाका येथील एमएसएमई केंद्राच्या जागेत प्रदर्शन आणि परिषद केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे असे एमएसएमई महाराष्ट्रचे संचालक प्रशांत पार्लेवार यांनी यावेळी सांगितले. महिला उद्योजकांची  उद्यम अंतर्गत नोंदणी करून त्यांना केंद्र सरकारच्या ई – मार्केट प्लसवर संधी देण्यात यावी अशी मागणी केली.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक उद्योजकांना नवीन व्यावसायिक तसेच , सरकारच्या सहकार्याने  व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होणार आहे. लघु-मध्यम उद्योग योजना, कॉर्पोरेट कंपन्यांसोबतचा  व्हेन्डर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, मुद्रा कर्ज योजना, परदेशातील व्यावसायिक संधी, आयात-निर्यात या विषयावर मार्गदर्शन देखील या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे.  या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्राच्या 27 जिल्ह्यांतून आलेल्या अनेक उद्योजकांचे स्टॉल आहेत.  थेट उत्पादकांसोबत संवाद साधण्याची संधी या प्रदर्शनाद्वारे उपलब्ध झाली आहे.

या कार्यक्रमात महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राची कला आणि संस्कृतीचे सादरीकरण करणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.