औरंगाबादचे हरित वैभव असलेल्या पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाला वर्तमान स्थितीत अत्यंत भकास स्वरुप आले आहे. केवळ साफसफाई अभावी मागील दोन वर्षांपासून हे उद्यान बंद आहे. उद्यानाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यानं उद्यान म्हणजे जनावरे चरण्याचं ठिकाण झालं आहे. त्यामुळे आता शहरातील नागरिक एकवटले असून उद्यानाच्या विकासासाठी केवळ घोषणा करणाऱ्या राजकारण्यांना घेरण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दोन वर्षांपूर्वी या उद्याानला पाच कोटींचा निधी देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर त्यांनी कधीही उद्यानाच्या कारभारात लक्ष घातले नाही, अशी खंत पैठणकरांची आहे.
अनेक वर्षांपासून पाटबंधारे विभागाच्या ताब्यात हे उद्यान आहे. मात्र येथे कर्मचारी कमी असल्याने पैठणमधील काही तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून येथे विविध फुलझाडे लावली. मात्र आता ती नष्ट झाली. या उद्यानात काटेरी झुडुपं आली आहेत. ही काटेरी झुडुपं काढली तरी उद्यान सुरु होईल, मात्र केवळ राजकीय व प्रशासनाच्या इच्छा शक्तीचा अभाव दिसत असल्याचा आरोप पैठण येथील नागरिक करत आहेत.
दोन वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पैठण येथील उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देणार, अशी घोषणा केली होती. दोन मात्र त्याचे काय झाले, हा प्रश्न आता विचारला जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील उद्यानाची पाहणी केली होती. आता पैठणमध्ये वजनदार राजकीय प्रस्थ असलेले मंत्री संदीपान भूमरे यांनीही उद्यान वाचवण्यासाठी काही लक्ष घालावे, अशी मागणी शहरातील व्यापारी, सामाजिक संघटना, पर्यटकांनी केली आहे.
रोहयो मंत्री आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे यांनी या उद्यानाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. त्याला बराच कालावधी लागणार असल्याने सध्या निदान उद्यान सुरु करण्यासाठी काही लाखांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पैठणकर नागरिकांची आहे. उद्यानाला नवसंजीवनी मिळण्यासाठी एवढा निधी पुरेसा असल्याचं त्यांचं मत आहे. आगामी जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी कोण पुढाकार घेतंय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.