200 हून अधिक हिंदी आणि प्रादेशिक भारतीय चित्रपटांमध्ये काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना बेला बोस यांचं 20 फेब्रुवारी रोजी निधन झालं. त्या 79 वर्षांच्या होत्या. अभिनेत्री शास्त्रीय मणिपुरी नृत्यात मास्टर होत्या. त्यांनी 1950 ते 1980 या काळात इंडस्ट्रीत काम केलं होतं. या ज्येष्ठ अभिनेत्री ‘जीने की राह, शिखर, ‘जय संतोषी मां’ सारख्या चित्रपटांसाठी ओळखल्या जातात.
बेला बोस या आपल्या अभिनयापेक्षा जास्त आपल्या नृत्यामुळे लोकप्रिय झाल्या होत्या. त्या जेव्हा-जेव्हा स्टेजवर यायच्या तेव्हा-तेव्हा वातावरण अगदी बदलून जायचं. त्यांच्या प्रत्येक स्टेपने लोकांच्या काळजाचा ठोका चुकत असे. मणिपुरी क्लासिकल डान्समध्ये त्या पारंगत होत्या.
बेला यांचा जन्म कोलकत्ता येथील एका सुखी कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील कपड्याचे उद्योजक होते. घरी अगदी भरभराटी होती. परंतु बँक क्रॅशमध्ये त्यांची सर्व संपत्ती निघून गेली. आणि त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. संपत्ती हातातून गेल्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये स्थलांतरण केलं. परंतु काही दिवसांतच एका अपघातात त्यांच्या वडिलांचं निधन झालं. आणि त्यांच्यावर संकटाचा डोंगर कोसळला.
वडिलांच्या मृत्यूनंतर बेला यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक सहकार्य करण्यासाठी बेला यांनी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. मात्र याकाळात त्यांनी आपलं शिक्षण सुरु ठेवलं होतं. दरम्यान त्यांनी शाळेतील एक डान्स ग्रुपसुद्धा जॉईन केला होता. या ग्रुपच्या आधारे त्यांनी ठिकठिकाणी डान्स करायला सुरुवात केली होती.बेला बोस यांना गुरुदत्त यांच्या ‘सौतेला भाई’ या सिनेमातून पहिला ब्रेक मिळाला होता. यावेळी त्या केवळ 17 वर्षांच्या होत्या. या ज्येष्ठ अभिनेत्रीने अनेक बंगाली नाटकांमध्येदेखील काम केलं आहे. त्यांनी खलनायिकेची भूमिकासुद्धा तितक्याच ताकतीने साकारली आहे.