नाशिक जिल्ह्यात 401 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 3 हजार 915 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 401 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 740 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 34, बागलाण 07, चांदवड 07, देवळा 07, दिंडोरी 12, इगतपुरी 20, कळवण 05, मालेगाव 05, नांदगाव 05, निफाड 43, सिन्नर 27, त्र्यंबकेश्वर 03, येवला 27 अशा एकूण 202 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 182, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 06 तर जिल्ह्याबाहेरील 11 रुग्ण असून, असे एकूण 401 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 13 हजार 56 रुग्ण आढळून आले आहेत.

नाशिक जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणच्या वावरासाठी आता नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. लस नसेल, तर कुठेही प्रवेश मिळणार नाही. विनालसीकरण लोक आढळले, तर संबंधित आस्थापनांना जबाबदार धरले जाईल. हे नवे नियम 23 तारखेपासून अंमलात येतील, अशी माहिती गुरुवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. नाशिकमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरजकुमार मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची बैठक झाली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी ही माहिती दिली.

नाशिकमध्ये 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. लसीकरण सुरू होऊन तब्बल 11 महिने लोटले आहेत. त्यात 18 वर्षांवरील 13 लाख 63 हजार नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यापैकी 11 लाख 87 हजार नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. मात्र, अद्यापही पावणेदोन लाख नागरिक लसीकरणाकडे फिरकलेही नाहीत. ही चिंतेची गोष्ट असून, त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. शिवाय एक लाख जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला नाही. त्यामुळे प्रशासन लसीकरण जास्त करण्यावर भर देत आहे. नाशिकरोड येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात सोमवारपासून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे कोव्हॅक्सीन लस देण्यात येत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. या विषाणूची संसर्ग क्षमता जास्त आहे. हे ध्यानात घेता कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित अंतराचे पालन करावे. एकाच ठिकाणी गर्दी करू नये. विशेषतः प्रत्येकाने मास्क वापरावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.