मराठवाड्यात लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर औरंगाबादेतील यंत्रणा अलर्ट झाली आहे. शहरातील संदिग्ध व्यक्तींचे नमूने पुण्यातील लॅबमध्ये पाठवले जात आहेत. जिनोम सिक्वेन्सिंगद्वारे अशांना ओमिक्रॉनचा संसर्ग आहे की नाही, हे तपासले जात आहे. औरंगाबादहून नमूने पाठवल्यानंतर पुण्याहून त्याचा अहवाल येण्यासाठी तब्बल दोन दिवस लागतात. त्यामुळे शहरात अद्ययावत जिनोम सिक्वेन्सिंगची लॅब असली पाहिजे, अशी मागणी मनपा आरोग्य विभागाकडून केली जात आहे. महाराष्ट्रात सध्या तीनच ठिकाणी जिनो सिक्वेन्सिंगच्या लॅब असून येत्या काळात औरंगाबाद आणि नागपूरमध्येही या लॅब सुरु होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही दिली होती. शहरावरचे आगामी ओमिक्रॉनचे संकट लक्षात घेता, अशी लॅब कधी सुरु होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेअंतर्गत ओमिक्रॉनचा रुग्ण तपासण्यासाठी घाटी रुग्णालयात अद्ययावत लॅबची आवश्यकता आहे. सध्या विदेशातून आलेल्या नागरिकांचे नमूने घेऊन घाटीला पाठवण्यात येतात. तेथून पुण्याला प्रयोगशाळेत जातात. तेथून रिपोर्ट येण्यासाठी प्रचंड प्रतीक्षा करावी लागते. तोपर्यंत रुग्ण बरा झालेला असतो. अशा स्थितीत औरंगाबादमध्येच ही लॅब उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाचा एक जिनोम कोड म्हणजेच एक युनिक कोड असतो. त्याच्या माध्यमातून त्या सजीवाबद्दल संपूर्ण माहिती मिळवता येते. मात्र प्रत्येक सजीवातील ही जिनोमची संरचना अत्यंत गुंतागुंतीची असते. याचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक त्याला विशिष्ट प्रकारच्या कोडमध्ये रुपांतरीत करतात. हा कोड माहिती करून घेण्यासाठी जी प्रक्रिया पार पाडली जाते, त्याला जिनोम सिक्वेन्सिंग म्हणतात.