चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी ताण-तणाव व्यवस्थापनावर व्याख्यान
जळगाव – जगात प्रत्येक व्यक्तीच्या मनावर कुठला ना कुठला ताण असतोच. पण ज्या माणसांना ताणाचे योग्य व्यवस्थापन करता येते ती माणसे यशस्वी होतात. आपण कसा विचार करतो यावर हे ताण व्यवस्थापनाचे कौशल्य अवलंबून असते. आपला दिनक्रम कसा आहे ? आपल्या सवयी कशा आहेत ? आपला स्वभाव आणि वर्तन कसे आहे यावर आपण कसा विचार करतो हे ठरते आणि आपला विचार प्रवाह हा आपण ज्यांच्या सोबत राहतो, त्यांच्या अनुरूप पुढे जात राहतो. त्यामुळे आपली संगत कशी आहे यावर आपले भवितव्य काय असेल हे अवलंबून असते. आपण जसे असतो तशीच माणसे आपल्या अवतीभवती असतात. त्यामुळे भवितव्य बदलायचे असेल तर आपल्याला स्वतःला आधी बदलावे लागेल, असे प्रतिपादन क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट हींप्नोथेरपिस्ट व व्यसनमुक्ती चळवळीचे प्रणेते नितीन विसपुते यांनी केले.
वेबिनारच्या माध्यमातून चेतना विसपुते यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीतून त्यांनी चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सतीश सिंदाडकर व प्रथम वर्षाचे विद्यार्थी हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही भरपूर प्रश्न विचारून उत्साह दाखविला.
ताणतणावाची निर्मिती कशी होते ? स्वयंसूचनांचा मनावर वाईट किंवा चांगला परिणाम कसा होतो ? आपण दुखी का होतो ? अभ्यास केल्यानंतरही नेमका परीक्षेत मनाचा गोंधळ का उडतो ? लोकांविषयी आपण चांगला विचार करतो पण लोक आपल्याविषयी वाईट विचार का करतात ? आपली सांगत चांगली असावी यासाठी आपण काय केले पाहिजे ? यासारख्या अनेक प्रश्नावर नितीन विसपुते यांनी मनमोकळेपणाने उत्तरे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
लोकांचा जेवढा विचार करू आपण तेवढे जास्त दुःखी होतो. त्यामुळे लोकांना आपल्याविषयी काय वाटते यापेक्षा आपण कसे आहोत आणि आपल्याला स्वतःविषयी काय वाटते हे जास्त महत्वाचे आहे. आपले जीवन हे लोकांच्या दृष्टीने नाही तर स्वतःच्या दृष्टिकोनाने बदलते, असे विसपुते यांनी सांगितले. खूप अभ्यास करतो परंतु आठवत नाही किंवा परीक्षेत पेपरमध्ये काय लिहावे हे सुचत नाही कारण आपण आधीपासूनच स्वतः नकारात्मक सूचना देत राहतो. स्वतःच्या क्षमतांवर शंका घेत राहतो. अभ्यास करताना आणि परीक्षेला जातानासुद्धा नकारत्मक कल्पना करत राहतो व बऱ्याचदा प्रत्यक्षात तसेच घडते. त्यामुळे मनाला सकारात्मक सूचना देण्याची सवय आपण स्वतःला लावून घेतली पाहिजे.
खूप विचार करणे, विचारांचा गोंधळ उडणे, त्यामुळे चिंता वाटणे, काही न सुचणे अशी लक्षणे अनेकांमध्ये आढळतात. बँकेमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा कामांचे सुनियोजित व्यवस्थापन व्हावे यासाठी त्याठिकाणी टोकनपद्धत असते. त्यानुसार ग्राहकाचा प्राधान्यक्रम ठरत असतो. अशीच टोकन पद्धत आपल्या विचारांनाही लावता येते. मनात येणाऱ्या विचारांचे व्यवस्थापन करण्यासाठी विचारांना टोकन नंबर देऊन गोंधळ कमी करता येऊ शकतो. कारण विचारांचे व्यवस्थापन म्हणजेच ताण-तणावाचे व्यवस्थापन होय. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराजांच्या ओव्यांचा दाखला देऊन अभ्यासपूर्ण विवेचन केले.
वि. आ. बुवा यांच्या ‘जेव्हांचे तेव्हा, जिथल्या तिथे, ज्याचे त्याला, या सूत्राची आठवण करून दिली. जेव्हांचे काम तेव्हा करावे, जिथून जे जे घेतो ते ते तिथल्या तिथे ठेवावे व जी गोष्ट किंवा काम ज्याचे असेल त्याच्याकडे सोपवावे म्हणजे ताण-तणाव कमी होऊन जगणे आनंददायी व सुंदर होते, असे नितीन विसपुते म्हणाले.
‘१३८’ च्या सूत्रामध्ये दिनक्रम असावा असा आग्रह त्यांनी विद्यार्थ्यांना केला. दररोज १ तास व्यायाम, ३ वेळा आहार आणि ८ तासांची शांत झोप यशस्वी जीवनासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय रडावसं वाटत असेल तर धायमोकलूं रडा, भावना दडपून ठेऊ नका, खळखळून हसा म्हणजे मन मोकळे होते, ताण हलका होतो. दररोजच्या कामांची यादी करा. पुढील आयुष्याचे नियोजन करा, निर्विकार म्हणजे म्हणजे चांगल्या किंवा वाईट गोष्टी गृहीत न धरता लोकांना भेटा, मोकळेपणाने व्यक्त व्हा, स्वतःकडे तटस्थपणे बघा अशा अनेक चांगल्या टिप्स नितीन विसपुते यांनी उपस्थितांना दिल्या.
यशाकडे प्रवास करायचा असेल तर स्व-संमोहन शिकून त्याचा उपयोग करावा असे त्यांनी सांगितले व संमोहनाचे प्रात्यक्षिकही घेतले. संमोहन म्हणजे अंतर्मनाशी जागरूकपणे होणारा संवाद. संमोहनाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत आणि मनाविरुद्ध संमोहन करता येत नाही. विद्यार्थी जीवनापासून संमोहनाद्वारे स्वतःला सकारात्मक सूचना देण्याची व मनावर नियंत्रण ठेवण्याची सवय लावून घेतली, श्रध्दाभावनेने नियमित प्रार्थना केली तर यशाच्या दिशेने आपला प्रवास सुरु होतो असे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. सतीश सिंदाडकर यांनी प्रास्ताविक केले.