बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू एकामागून एक अनेक यशस्वी चित्रपट देत आहेत. ती नेहमीच तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे, परंतु ती आपले वैयक्तिक जीवन नेहमीच मीडियाच्या कॅमेरापासून दूर ठेवते. तिच्या कामाऐवजी कोणीही तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललेले तापसीला आवडत नाही. आता अलीकडेच तापसीने सांगितले की, तिच्या पालकांना तिच्या लग्नाबद्दल खूप चिंता वाटते. याशिवाय आपल्या आई-वडिलांच्या संमतीशिवाय ती लग्न करणार नाही, असेही तापसीने म्हटले आहे.
तापसीने सांगितले की, तिच्या पालकांना आवडत नसलेल्या व्यक्तीशी ती कधीही लग्न करणार नाही. तापसी म्हणाली की, ती कोणाबरोबरही टाईमपास म्हणून नातेसंबंध ठेवणार नाही. परंतु, जर ती डेट करत असलेली व्यक्ती तिच्या पालकांना आवडत नसेल, तर ती त्याच्याशी लग्न करणार नाही.
तापसी म्हणाली, ‘मी आईवडिलांच्या संमतीशिवाय लग्न करणार नाही, असे मी डेट केलेल्या सर्वांना सांगितले आहे. मला असं वाटायचं की, मी ज्याला डेट करतेय त्याच्याशी लग्न केले पाहिजे. वास्तविक, मी ज्याही व्यक्तीसोबत डेट ठरवते, तेव्हा माझ्या मनात हे येते की, जर मला लग्न करायचे असेल तरच मी या व्यक्तीवर वेळ आणि शक्ती खर्च करू शकतो. मला उगाच वेळ काढण्यात रस नाही. तर माझा मुद्दा असा आहे की, जर लग्न शक्य नसेल, तर पुढे काहीही विचार करू नका. माझे पालक आता म्हणायला लागले आहेत की, कोणाबरोबरही कर, पण आता लग्न कर. त्यांना चिंता वाटते की, कदाचित मी कधीही लग्न करणार नाही.’
सध्या तापसी बॅडमिंटनपटू मॅथियस बोयला डेट करत आहे. ती बर्याचदा त्याच्याबरोबर फिरायला जात असते. काही काळापूर्वीच ती त्याच्याबरोबर मालदीवमध्ये गेली होती. मात्र, ती सोशल मीडियावर मॅथियसवरचे प्रेम कधीच व्यक्त करत नाही.
जेव्हा तापसीच्या घरी आयकर अधिकाऱ्यांचा छापा पडला, त्यावेळी तिला मॅथियसकडून खूप पाठिंबा मिळाला. तापसीच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, ती नुकतीच ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटात दिसली. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.