ऑक्टोबर महिन्यात लहान मुलांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात

भारतात येत्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लहान मुलांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात होऊ शकेल, असा विश्वास सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. बकुळ पारेख यांनी व्यक्त केला आहे. खासदार राहुल शेवाळे आणि श्री राधा फाऊंडेशन आयोजित ‘इन्फोडोस’ या डिजिटल जनजागृती अभियानात ते बोलत होते. डॉ. पारेख यांच्या या विधानाने पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

‘इन्फोडोस’ या जनजागृती अभियानाच्या दुसऱ्या सत्रात ‘कोरोनाकाळात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी’ या विषयावर डॉ. बकुळ पारेख यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधला. डॉ. पारेख म्हणाले की, आत्तापर्यंत आपण 18 वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण करत आहोत. मात्र तिसऱ्या लाटेत लहान मुलांना होऊ शकणाऱ्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, जगभरात लहान मुलांच्या कोरोना लसीकरणासाठी चाचण्या सुरू आहेत. अमेरिकेत फायझर कंपनीने 12 वर्षांवरील मुलांवर कोरोना लसीकरणाच्या चाचण्यांना सुरुवात केली आहे. भारतात देखील, बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या चाचण्या बालकांवर सुरू आहेत. या चाचण्यांचा सकारात्मक प्रतिसाद दिसत आहे. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लहान मुलांचे कोरोना लसीकरण लवकरात लवकर करण्याचा विचार सरकारी पातळीवर सूरु आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लहान मुलांच्या कोरोना लसीकरणाला भारतात सुरुवात होऊ शकेल.तसेच गरोदर महिलांचेही कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने, त्यालाही लवकरच सुरुवात होईल, असंही डॉ पारेख म्हणाले.

अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी सूत्रसंचालन केलेल्या या चर्चासत्रात डॉ. पारेख यांनी कोरोना काळात लहान मुलांचा आहार, मानसिक संतुलन, डेल्टा प्लस अशा विविध विषयांवरील जनतेच्या मनातील शंकांचे निरसन केले. कोरोनाकाळातील लहान मुलांची काळजी, याविषयावर यथोचित माहिती देणारे हे संपूर्ण चर्चासत्र,खासदार राहुल शेवाळे यांच्या फेसबुक आणि युट्युब चॅनेलवर उपलब्ध आहे, अशी माहिती इन्फोडोसच्या टीमच्या वतीने देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.