उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यामुळे त्यांना लखनऊच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचं एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे.
कल्याण सिंह यांच्या शरीरावर सूज आल्याने त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. कल्याण सिंह यांना गेल्या आठवड्यातही राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या रक्ताची चाचणी करण्यात आली होती. त्यांच्या रक्तात यूरिया आणि क्रिटनिन वाढल्याचं सांगण्यात आलं होतं.
दरम्यान, कल्याण सिंह यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी रुग्णालयात जाऊन कल्याण सिंह यांची विचारपूस केली. तसेच डॉक्टरांशी बोलून कल्याण सिंह यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. कल्याण सिंह यांची प्रकृती स्थिर असून चिंतेचं कारण नसल्याचं डॉक्टरांनी योगींना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.
कल्याण सिंह यांना भाजपचे उत्तर प्रदेशातील हिंदूहृदय सम्राट म्हणून ओळखले जाते. हजारो कारसेवकांनी जेव्हा बाबरी मशिदीची इमारत पाडली तेव्हा कल्याण सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. मात्र, मशीद पाडल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याने त्यांनी 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी पदाचा राजीनामा दिला होता. सिंह यांनी 6 डिसेंबरच्या मेळाव्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सादर केले होते, त्यात असे म्हटले होते की, मशीदीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ, आमचं सरकार मशिदीची पूर्ण काळजी घेईल. तथापि, तसे होऊ शकले नाही. असे म्हटले जाते की, बाबरी विध्वंस प्रकरणात कल्याणसिंह यांची पडद्यामागे मोठी भूमिका होती आणि सर्व काही त्यांच्या संमतीने घडत होते. कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे, परंतु या प्रकरणामुळे ते भाजपच्या सक्रीय राजकारणापासून दूर फेकले गेले. भाजपच्या या ‘हिंदूहृदय सम्राटा’ने यूपीमध्ये पक्षाला मोठी ओळख मिळवून दिली आणि नंतर पक्षाने त्यांना राज्यपाल म्हणून नियुक्त केले.