पु. ल. देशपांडे यांची पुस्तके आता ऑडिओ स्वरूपात

प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त स्टोरीटेल मराठीवर पुलंच्या आगळ्यावेगळ्या पुस्तकांची भेट स्टोरीटेलच्या श्रोत्यांना मिळणार आहे. पुलंनी लिहिलेले वेगळ्या विषयांवरचे लेख, त्यांनी इतर कलावंत, साहित्यिकांना लेखनातून दिलेली ‘दाद’, तसेच त्यांचे काही हलकेफुलके व वैचारिक स्वरूपाचे लेखनही आहे. ‘विश्रब्ध शारदा’सारख्या अनेक पुस्तकांना त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना ‘चार शब्द’ या त्यांच्या वेगळ्या प्रकारच्या पुस्तकात समाविष्ट आहेत.

याच पुस्तकातले ‘विश्रब्ध शारदा’ आणि ‘रंग माझा वेगळा’ हे दोन अत्यंत महत्वाचे लेख ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांनी स्टोरीटेलसाठी वाचले आहेत. ‘अपुर्वाई’ आणि ‘जावे त्यांच्या देशा’ यांसारखी खुमासदार प्रवासवर्णने 8 तारखेला श्रोत्यांच्या भेटीस येत आहेत. ‘अपुर्वाई’ हे पुस्तक अभिनेता आस्ताद काळे यांनी वाचलं आहे, तर ‘जावे त्यांच्या देशा’ या पुस्तकाची रंगत अभिनेता प्रसाद ओक यांनी आपल्या आवाजाद्वारे आणखी खुलवली आहे.

हसवणूक’ हे पुलंचं आणखी एक विनोदी पुस्तक. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी या पुस्तकातील निवडक लेख स्टोरीटेलवर सादर केले आहेत. तसेच ‘आमचा धंदा’, ‘माझे खाद्यजीवन’, ‘माशी’, ‘साता वारांची कहाणी’, ‘चाळिशी’, ‘रस्ते’ हे पुलंचे प्रभावळकरांनी सादर केलेले लेख श्रोत्यांना नक्की आवडतील.

तर ‘दाद’ या पुस्तकातील ‘एक दु:खाने गदगदलेले झाड’ आणि ‘कोसला वाचल्यावर’ हे लेख पुलंनी इतर व्यक्तींच्या उत्तम कार्याला मनापासून दिलेली पोचपावती आहेत. पुलंचा स्वभावच तसा, गुणग्राही आणि उत्तम कलेला, कलाकाराला मनस्वी दाद देणारा. या त्यांच्या उमद्या स्वभावातून आणि व्यासंगातून त्यांनी अनेक थोर व्यक्तींच्या कार्याची महती सांगणारी अत्यंत वाचनीय आणि अभ्यासपूर्ण स्फुटं लिहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.