आज संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी मार्गाचे भूमिपूजन होत नाहीये. हे केवळ मार्गाचे भूमिपूजन नाहीये. तर पंढरपूरकडे जाणारे हे मार्ग भागवत धर्माची पताका आणखी उंचावेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हीसीवरून संवाद साधला. तर पालखी मार्ग भूमिपूजन कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पंढरपुरात दाखल झाले होते. याप्रसंगी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री कपिल पाटील, रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के सिंग, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, भाजपचे प्रदेश्याध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप आमदार खासदार उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. मोदींनी राम कृष्णहरी… राम कृष्णहरी म्हणत कार्यक्रमाची सुरुवात केली. शंकराचार्याने सांगितलं आहे पंढरपूरला आनंदाचंही प्रत्यक्ष स्वरुप आहे. आज त्यात सेवेचा आनंदही मिसळला आहे. मला आनंद होत आहे संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गाचा शुभारंभ होत आहे. वारकऱ्यांना सुविधा मिळणार आहे. पंढरपुराकडे जाणारे हे मार्ग भागवत धर्माची पताका आणखी उंचावेल, असं मोदी म्हणाले.
दिंडीत जातपात नसते. भेदाभेद नसतो. सर्व वारकरी गुरुभाऊ आहे. वारकऱ्यांची एकच जात आहे. एकच गोत्रं आहे. ते म्हणजे विठ्ठल गोत्रं आहे. मी जेव्हा सबका साथ, सबका विकास म्हणतो त्याच्यामागे हीच भावना असते. हीच महान परंपरा असते. सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या विकासासाठी प्रेरित करते. पंढरपूरची अभा, अभिव्यक्ती सर्व काही अलौकीक आहे.
आपण म्हणतो ना… माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिवरी. माझं पहिलं नातं गुजरातच्या द्वारकाशी आहे. माझं दुसरं नातं काशीशी आहे. मी काशीचा रहिवासी आहे. आणि आपल्यासाठी पंढरपूर ही दुसरी काशी आहे. या भूमीत आजही देवाचा वास आहे. सृष्टीची निर्मिती झाली नव्हती तेव्हापासून पंढरपूर अस्तित्वात असल्याचं संत नामदेवांनीही सांगितलं आहे. या भूमीने अनेक संत दिले. युग संत निर्माण केले. या भूमीने भारताला नवं चैतन्य दिलं, ऊर्जा दिली, असंही त्यांनी सांगितलं. भारतात नेहमीच अशा विभूती जन्माला आल्या. त्यांनी देशाला आणि जगालाही मार्गदर्शन केलं.