भोपाळमधील कमला नेहरू रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये रात्री भीषण आग लागली. या घटनेट आतापर्यंत चार मुलांचा मृत्यू झालाय आणि एकूण 36 मुलांना बाहेर काढल्या गेल्याची माहिती मिळतेय. सिलिंडर फुटल्याने आग लागल्याचं सांगितलं जातय.
रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर मुलांचा वॉर्ड आहे. आग लागत्यानंतर अनेक रूग्णांना स्ट्रेचरमधून बाहेर काढून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. तर, मुलांच्या कुटुंबीयांना आत प्रवेश दिला जात नाही. अशा स्थितीत आपल्या मुलांचा शोध घेण्यासाठी गोंधळ उडाला.
अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. धुराचे प्रचंड लोट असल्याने आग विझवणे कठीण जात आहे. फतेहगड, बैरागढ, पुल बोगदा आणि इतर अग्निशमन केंद्रातील आठ अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहेत.
माहिती मिळताच मंत्री विश्वास सारंग आणि डीआयजी इर्शाद वलीही घटनास्थळी पोहोचले. डॉक्टरांच्या पथकाला रुग्णालयात पाचारण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.