आंध्रपदेशातील तिरुमालामधील तिरुपतीच्या मंदिराबाहेर वर्षानुवर्षे भीक मागणाऱ्या एका भिकाऱ्याकडे लाखो रुपयांचं घबाड सापडलं आहे. त्याच्या घरात दोन संदूक भरून नोटा सापडल्या आहेत. या नोटा मोजता मोजता अधिकाऱ्यांचीह दमछाक झाली असून सर्वचजण अवाक् झाले आहेत.
64 वर्षीय श्रीनिवासन हा तिरुमाला येथे व्हीआयपी यात्रेकरुंकडून भीख मागत होता. जोपर्यंत भीख मिळत नाही, तोपर्यंत तो व्हीआयपी भक्तांचा पिच्छा पुरवायचा. तसेच तिरुपतीचं दर्शन घेऊन आलेल्यांच्या कपाळाला तो टिळा लावत असे. त्यामुळे त्याला दक्षिणाही मिळत असे. त्यांच्याच घरात आता लाखो रुपये सापडले आहेत. गेल्या वर्षापासून काही लोक शेषाचल नगर येथील श्रीनिवासन याच्या घरावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्याकडे लाखो रुपये आहेत, असा या लोकांना अंदाज होता. त्यामुळे श्रीनिवासनच्या मृत्यूनंतर शेजाऱ्यांनी टीटीडीच्या अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना त्याबाबतची माहिती दिली.
त्यानंतर पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी श्रीनिवासन याच्या घरातून दोन संदूक जप्त केल्या. पण या संदूक उघडताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या दोन्ही संदूकमध्ये नोटाच नोटा होत्या. श्रीनिवासन याच्यामागे कुणीच नसल्याने त्याच्या संपत्तीवर कुणीही दावा करू शकणार नसल्याचं माहित असल्याने व्हिजिलन्स आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही संदूकमधील पैशांची मोजणी सुरू केली. त्यात त्यांना 6 लाख 15 हजार 50 रुपये सापडले.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पादूकोन तिरुपतीच्या दर्शनासाठी आली होती. त्यावेळी श्रीनिवासनने दीपिकाचा पिच्छा केला होता. दीपिकाकडून भीख घेतल्यानंतरच त्याने तिचा पिच्छा सोडला होता. श्रीनिवासन तरुणपणातच तिरुपतीला आला होता. त्याची तिरुपती बालाजीवर निस्सीम श्रद्धा होती. त्याचा स्वभाव चांगला होता. तो विनम्र असल्याचंही सांगितलं जातं.