मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून समाजातील अभ्यासक आणि जाणकारांच्या भेटीगाठी सुरु असतानाच आंदोलनासाठी आग्रही असणाऱ्या विनायक मेटे यांनीही हालचाल सुरु केली आहे. विनायक मेटे यांनी 5 जून रोजी बीडमध्ये मराठा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. या मोर्चासाठी परवानगी मिळवण्यासाठी मेटे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली.
यावेळी विनायक मेटे यांनी गृहमंत्र्यांकडे एक निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजात प्रचंड प्रमाणात रोष आहे. 5 जून 2021 बीड येथे मराठा समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे.
सदरचा मोर्चा मराठा क्रांती मोर्चांच्या प्रथेप्रमाणे शांततेत व शिस्तीत, कायदा व सुव्यवस्थेला कुठलीही बाधा येऊ न देता काढला जाईल. त्याचप्रमाणे करोना महामारीच्या काळातील आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करून, सोशल डिस्टनसिंग पाळून हा मोर्चा काढला जाईल याची खात्री असावी.
मोर्चाची घोषणा झाल्यापासून समाजात सक्रीय असलेल्या कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाकडून त्रास दिला जात असल्याचे आढळून आले आहे. तरी आजवर निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या शांततेत निघण्याचा इतिहास लक्षात घेऊन हा नियोजित मोर्चा शांततेत काढण्यासाठी पोलीस प्रशासन व आपण सहकार्य करण्याची मागणी, या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मोर्चे काढण्याला संभाजीराजे छत्रपती यांचा विरोध आहे. आंदोलन काय असतं, हे कोणीही मला शिकवू नये. आक्रमक व्हायला दोन मिनिटं लागतात. आंदोलनाला काय लागतं, आता लगेच करु. पण त्यामध्ये कोणी मयत झाले तर त्याला जबाबदार कोण, शाहुंचा वंशज, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला होता.
जेव्हा एखादी गोष्ट राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवायची असते, तेव्हा मोर्चे काढले जातात. मराठा समाजाने 58 मोर्चे काढून आपलं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवलं आहे. मराठा समाजाला काय हवंय, हे राज्यकर्त्यांना माहिती आहे. मग परत एकदा मोर्चे काढून लोकांना वेठीस का धरायचे, असा सवाल संभाजीराजे यांनी इतर मराठा नेत्यांना विचारला होता.