चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातल्यानंतर भारतातही कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे आतापर्यंत 4 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता राज्यातही त्यादृष्टीने खबरदारीचे उपाय घ्यायला सुरुवात झाली आहे. राज्यातील प्रमुख मंदिर प्रशानसनही याबाबत सतर्क झाली आहेत. तसेच त्यासंदर्भात राज्यातील कोल्हापूर, शिर्डी आणि पुणे दगडूशेठ हलवाई या प्रमुख मंदिर प्रशासनाने यासंदर्भात निर्णयही घेतला आहे.
कोल्हापूर अंबाबाई माता मंदिर –
कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांसाठी उद्यापासून मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं निर्णय घेतला आहे. मात्र, भाविकांना अद्याप मास्क सक्ती करण्यात आलेली नाही. जगभरात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पावणे दोनशे कर्मचाऱ्यांना उद्यापासून मास्क सक्तीचा होणार आहे.
शिर्डी साईबाबा मंदिर –
परदेशातील कोरोनाचे महासंकट पाहता शिर्डीचे साईबाबा संस्थान सतर्क झाले आहे. दर्शनाला येणाऱ्या साई भक्तांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे. तसेच ज्यांनी बूस्टर डोस घेतलेले नसतील त्यांनी ते घ्यावेत. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन साई संस्थानचे प्रभारी कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.
पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती –
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थान मध्ये दर्शनाला जाणार असाल तर आधी मास्क घालावा लागणार आहे. गणेशभक्तांनी दर्शनासाठी येताना मास्क वापरण्याचे आवाहन मंदीर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तातडीने गणेशभक्तासांठी पाच हजार मास्क खरेदी करण्यात येणार आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आयएमएच्या नवीन मार्गदर्शिकेत काय –
1. प्रत्येकाने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावे, असे आवाहन आयएमएने केले आहे
2. साबणाने हात धुवा, सॅनिटायझर वापरा
3. IMA ने सामाजिक अंतर पाळण्यास सांगितले.
4. सार्वजनिक मेळावा टाळण्याच्या सूचना आयएमएने केल्या आहेत.
5. शक्य असल्यास आंतरराष्ट्रीय प्रवास टाळा.
6. सर्दी, खोकला, सर्दी यांसारख्या लक्षणांसाठी चाचणी घ्या
7. लग्न समारंभ, मेळावा पुढे ढकलण्यात यावा, असे आवाहन आयएमएने केले आहे.