सातवीत शिकणाऱ्या एका 13 वर्षांच्या मुलीने शाळेच्या इमारतीवरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना सोमवारी सकाळी कांजूरमार्ग येथील एका शाळेत घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही विद्यार्थीनी मानसिक तणावात होती. यातूनच तिने हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे.
सोमवारी सकाळी ती शाळेच्या इमारतीच्या छतावर गेली आणि तिथूनच उडी घेत तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. काहीतरी पडल्याचा आवाज येताच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तिथे धाव घेतली. यानंतर जखमी अवस्थेतच या मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, या विद्यार्थीनीच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं आणि ती सध्या तिच्या आईसोबत राहाते. वडिलांच्या निधनानंतर ती मानसिक तणावात होती. यातूनच आलेल्या नैराश्यातून तिने हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.