राज्यात मोर्चेबांधणीसाठी भाजप जन आशीर्वाद यात्रा सुरू करणार

राज्यातून भाजपच्या चार नेत्यांची केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर भाजपने आता राज्यात मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. या चारही नेत्यांना घेऊन भाजप जन आशीर्वाद यात्रा सुरू करणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून भाजप संपूर्ण राज्य पिंजून काढणार आहे. राज्यातील महाविकास आघाडीला शह देण्यासाठीच भाजपने जनआशीर्वाद सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार नवनियुक्त मंत्री जनआशीर्वाद यात्रेद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. येत्या 16 ऑगस्टपासून राज्याच्या वेगवेगळया भागात ही जन आशीर्वाद यात्रा काढण्यात, अशी माहिती भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या यात्रेचे प्रमुख आमदार संजय केळकर यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची यात्रा 16 ते 20 ऑगस्ट या काळात, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची यात्रा 16 ते 20 ऑगस्ट या काळात , केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची यात्रा 16 ते 21 ऑगस्ट या काळात तर केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची यात्रा 19 ते 25 ऑगस्ट या काळात निघणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

कपिल पाटील यांची यात्रा ठाणे, रायगड जिल्ह्यात 570 किलोमीटर प्रवास करणार आहे. डॉ. भारती पवार यांची यात्रा पालघर , नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील 5 लोकसभा मतदारसंघात 431 किलोमीटर एवढा प्रवास करेल. डॉ. भागवत कराड यांची यात्रा मराठवाड्यातील 7 लोकसभा मतदार संघात 623 किलोमीटर प्रवास करेल. नारायण राणे यांची यात्रा 19 ऑगस्ट रोजी मुंबईतून सुरू होईल. वसई- विरार महापालिका क्षेत्र आणि रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही यात्रा 650 किलोमीटर एवढा प्रवास करेल. या यात्रेत हे चारही मंत्री समाजाच्या विविध घटकांचे प्रश्न जाणून घेतील. तसेच केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशीही संवाद साधतील. आ. निरंजन डावखरे, आ. सुनील राणे, आ. अशोक उईके, प्रमोद जठार, राजन नाईक हे या यात्रांचे समन्वयक म्हणून काम पाहतील, असे आमदार केळकर यांनी सांगितले.
(फोटो क्रेडिट गुगल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.