प्रख्यात मराठी अभिनेता भूषण कडू याच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन झाले. कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान कादंबरी कडू यांची प्राणज्योत मालवली. कडू कुटुंबीयांसाठी हा मोठा आघात आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात सहभागी झालेल्या भूषण कडूसोबत त्याच्या कुटुंबाची ओळखही प्रेक्षकांना झाली होती. भूषणला प्रकीर्त हा आठ वर्षांचा मुलगा आहे.
कादंबरी कडू 39 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले होते. उपचारादरम्यान कादंबरी कडू यांनी अखेरचा श्वास घेतला.
भूषण कडूने अनेक चित्रपट, मालिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. एक डाव भटाचा, श्यामची मम्मी, भुताची शाळा, बत्ती गुल हाऊस फुल, मस्त चाललंय आमचं, टारगेट, दगडाबाईची चाळ यासारख्या कलाकृतींमधून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आला. कॉमेडीची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राची हास्यजत्रा यासारख्या विनोदी कार्यक्रमांतून आपल्या खास विनोदी शैलीने भूषणने प्रेक्षकांना पोट धरुन हसायला लावले.
कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी या रिअॕलिटीच्या पहिल्या सिजनमध्येही भूषणने हजेरी लावली होती. फॅमिली स्पेशल एपिसोडच्या निमित्ताने भूषणची पत्नी कादंबरी आणि मुलाने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली होती. यावेळी बऱ्याच दिवसांनी आपल्या मुलाला पाहताना भूषणच्या अश्रूंचा बांध फुटला होता. बाप-लेकाच्या नात्याची वीण पाहून स्पर्धक आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडाही ओलावल्या होत्या.
बिग बॉस मराठीची विजेती आणि अभिनेत्री मेघा धाडे हिनेही कादंबरीच्या निधनाचा धक्का बसल्याचे सांगितले. बिग बॉसच्या घरात आमची पहिल्यांदा ओळख झाली. ती अत्यंत कणखर होती. तिचा आत्मविश्वास पाहूनच मी थक्क झाले होते. ती नेहमीच भूषणला पाठिंबा द्यायची. भूषण बिग बॉसच्या घरात असताना तिने बाहेरची परिस्थिती अत्यंत लीलया एकहाती सांभाळली होती, अशा भावना मेघाने व्यक्त केल्या आहेत.