महाराष्ट्रातील सत्ताबदलाचं नाट्य शांत झालेलं असतानाच ब्रिटनमध्येही बंडाचे वारे वाहू लागले आहेत. ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी मंगळवारी राजीनामा दिला. त्यामुळे ब्रिटनमधील बोरीस जॉन्सन सरकार अडचणीत सापडले आहे. ‘घोटाळ्यांच्या मालिकांमुळे देशहिताचा विचार करत आपण हा निर्णय घेतला आहे. जॉन्सन सरकारनं देशहितामध्ये काम करण्याची योग्यता गमावली आहे. त्यामुळे आपण या सरकारमध्ये काम करू शकत नाही’. असे वाजिद यांनी सांगितले आहे. जाविद प्रमाणेच ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनीही राजीनामा दिला आहे.
जाविद यांनी या पत्रामध्ये म्हंटले आहे की, ‘अनेक खासदार तसंच नागरिकांचा सरकारच्या क्षमतेवरील विश्वास उडाला आहे. तुमच्या नेतृत्त्वामध्ये ही परिस्थिती सुधारणार नाही, हे सांगायला मला खेद वाटतो. तुम्ही माझा विश्वास गमावला आहे.’ असा ठपका त्यांनी ठेवला आहे. 2 मंत्र्यांच्या अचानक राजीमाम्यामुळे जॉन्सन सरकार संकटात आले आहे. आता पंतप्रधान जॉन्सन देखील लवकरच राजीनामा देतील, असं मानलं जात आहे.
आरोग्य मंत्री साजिद जाविद यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय वंशाचे ब्रिटीश मंत्री ऋषी सुनक यांनीही राजीनामा दिला आहे. जॉन्सन सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी एका माजी सनदी अधिकाऱ्यानं निलंबित खासदार ख्रिस पिंचर यांच्यावरील आरोपांबाबत ब्रिटीश पंतप्रधानांवर टीका केली होती. ‘लोकांच्या सरकारकडून अपेक्षा आहेत. सरकारनं योग्य, सक्षम आणि गंभीर पद्धतीनं काम करावं’ असं ट्विट त्यांनी केलं होतं.