एकीकडे शिवसेनेचे आमदार एवढ्या मोठ्या प्रमाणावर फुटलेले असतानाच आता खासदारांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवलं आहे. 18 तारखेला होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजप पुरस्कृत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशा मागणीचं पत्र शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. आदिवासी समाजातील एका कतृत्त्ववान महिलेचा सन्मान करण्यासाठी शिवसेना पक्षाने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा आणि त्यासाठी पक्षाच्या सर्व खासदारांना आदेश द्यावा, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी पक्षप्रमुखांकडे केली आहे.
राष्ट्रपती निवडणूक आणि शिवसेनेचा इतिहास
शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली पण ते अजूनही युपीएमध्ये सहभागी झालेले नाहीत. याआधीही एनडीएमध्ये असताना शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळी वेगळी भूमिका घेतली होती. पहिल्या महिला मराठी राष्ट्रपती म्हणून शिवसेनेने प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. तर प्रणब मुखर्जी यांच्यावेळीही शिवसेनेने त्यांना मत दिलं होतं. त्यावेळी प्रणब मुखर्जी हे स्वत: मातोश्रीवर येऊन बाळासाहेब ठाकरेंना भेटले होते.
याआधी प्रतिभा पाटील आणि प्रणब मुखर्जी यांच्यावेळी एनडीएमध्ये असूनही शिवसेनेने विरोधी पक्षातल्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. आता तर शिवसेनेने भाजपविरोधात दंड थोपटले आहेत, त्यामुळे यावेळी उद्धव ठाकरे भाजपने पाठिंबा दिलेल्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
शिवसेना खासदार काय करणार?
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे खासदारही आपल्या संपर्कात असल्याचं वक्तव्य केलं आहे, त्यातच आता शिवसेना खासदारांकडूनही भाजप पुरस्कृत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायची मागणी केली जात आहे, त्यामुळे निवडणुकीवेळी शिवसेना खासदार कोणती भूमिका घेणार, हा मोठा प्रश्न आहे. मुख्य म्हणजे दिल्लीमध्ये झालेल्या विरोधी पक्षांच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या बैठकीला शिवसेना नेते उपस्थित राहिले होते.