रीमा लागू बॉलिवूडची मराठमोळी आई..

रीमा लागू या भारतीय मनोरंजसृष्टीतील सर्वोत्कृट अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जायच्या. मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये त्यांनी आपल्या दर्जेदार अभिनय शैलीची कमाल दाखवली होती. जवळपास तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या महान अभिनेत्रीचा आज स्मृतीदिन आहे. या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी आज पुन्हा एकदा त्यांच्या आठवणींना नव्यानं उजाळा दिला आहे.

चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून आपला प्रभाव टाकणाऱ्या रीमा यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या आईकडूनच मिळाला होता. रीमा यांचं माहेरचं नाव नयन भडभडे असं होतं. त्यांची आई मंदाकिनी भडभडे या देखील एक उत्तम अभिनेत्री होत्या. रीमा लागू यांचं बालपण पुण्यात गेलं. शाळेत असल्यापासूनच त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती. ‘हिरवा चुडा’, ‘हा माझा मार्ग एकला’ अशा चित्रपटांतून ‘बेबी नयन’ या नावाने बालकलाकार म्हणून रिमा यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

त्यानंतर माध्यमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी मराठी नाटकांमधून अभिनयक्षेत्रात पाऊल टाकले आणि मागे वळून पाहिलेच नाही. ‘घर तिघांचं हवं’, ‘चल आटप लवकर’, ‘झाले मोकळे आकाश’, ‘तो एक क्षण’, ‘पुरुष’, ‘बुलंद’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘विठो रखुमाय’, ‘सासू माझी ढांसू’ यासारख्या दर्जेदार नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचे खणखणीत नाणे वाजवले होते. ‘पुरुष’ या नाटकातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. अभिनेता विवेक लागू यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्या रीमा लागू म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मात्र काही वर्षांनंतर दोघेही विभक्त झाले.

ऐंशीच्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीकडे आपला मोर्चा वळवला. 1980 सालच्या ‘आक्रोश’, ‘कलयुग’ या चित्रपटांपासून त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर ‘रिहाई’, ‘कयामत से कयामत तक’, ‘मैने प्यार किया’, ‘हम आप के हैं कौन’, ‘वास्तव’, ‘कल हो ना हो’ यांसारख्या कित्येक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखवली. विशेत: त्यांनी साकारलेल्या आईच्या भूमिका प्रचंड गाजल्या. अत्यंत ग्लॅमरस आई म्हणून त्यांनी लोकप्रियता मिळवली. आपल्या वाटय़ाला आलेल्या आईच्या भूमिकेतही त्यांनी वैविध्य ठेवत आपली दखल घ्यायला भाग पाडले. त्यांची प्रत्येक आईची भूमिका लोकांच्या लक्षात राहिली, इतक्या सहजतेने त्यांनी त्या व्यक्तिरेखा जिवंत केल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.