15 जिल्हा बँकांच्या निवडणुका घेण्यास परवानगी

महाराष्ट्रातील 15 जिल्हा बँकांच्या निवडणुका घेण्यास परवानगी मिळाल्यानंतर सहकार निवडणूक प्राधिकरणाने मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र त्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावट कायम आहे. या बँकांच्या अंतिम मतदार याद्या 27 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. मात्र मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर किमान एक महिन्याच्या कालावधीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस प्रत्यक्ष निवडणुका होऊ शकणार आहेत.

कोरोना रुग्णसंख्या घटत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोना संसर्गाची तिसरी लाट सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात येणार असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे जिल्हा बँकांच्या निवडणुका कोरोनाची तिसरी लाट येण्यावरच अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पहिल्या टप्प्यात राज्यातील 15 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे, लातूर, मुंबई, जळगाव, रत्नागिरी, धुळे-नंदुरबार, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, सातारा, नाशिक, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर आणि बुलडाणा या जिल्हा बँकांचा समावेश आहे.

सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील, त्या टप्प्यावर 31 ऑगस्टपर्यंत स्थगित केल्या आहेत. मात्र, 9 ऑगस्टच्या आदेशानुसार जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती, त्या टप्प्यापासूनच पुढे कार्यवाही सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार मतदार यादी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.