आज दि.२ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

अकोल्यात बियाणे विक्री महोत्सवास सुरुवात; तब्बल ८२६ शेतकऱ्यांची बियाणे विक्रीसाठी उपलब्ध

राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या घरगुती बियाणे विक्री महोत्सवला प्रारंभ झाला आहे. अकोला जिल्ह्यातील 7 तालुक्यांतील बाजार समितीत या महोत्सवला सुरुवात झाली आहे. या महोत्सवात शेतकऱ्यांनी तयार केलेले घरगुती बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत, तर हेच घरगुती बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी उपस्थिती लावलेली आहे. शेतकऱ्यांना घरगुती बियाणे स्वस्त दरात उपलब्ध व्हावे, तसेच बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना आपल्याकडील बियाणे विक्री करता यावे, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीत पार पडला.

इराकमध्ये सर्वात मोठा जलाशय कोरडा पडला! तळात सापडलं 3400 वर्षे जुनं शहर

हवामान बदलामुळे इराकमध्ये उष्मा प्रचंड वाढला आहे. वाढत्या तापमानामुळे इथल्या मोसुल या मोठ्या जलाशयातील पाणी आटलं आहे. यानंतर पाण्याखाली दडलेले एक प्राचीन शहर समोर आलं आहे. 3400 वर्षे जुन्या शहराचा शोध निसर्गाच्या विनाशाच्या दिशेनं चालेल्या बदलामुळे लागला असून, हे आनंदाऐवजी चिंतेचं कारण आहे.इराकमधलं हे प्राचीन शहर एकेकाळी उत्तर मेसोपोटेमियामधील इंडो-इराणी साम्राज्य मित्तानीच्या टायग्रिस नदीवर वसलेलं होतं. इराकमध्ये सध्या भीषण दुष्काळ पडला असून, त्यामुळे देशातील सर्वात मोठा जलाशय कोरडा पडला आहे. कुर्दिश आणि जर्मन संशोधकांच्या टीमने या शहराचा शोध लावला आहे.

अनिल देशमुखांचा पाय आणखी खोलात, CBI ने दाखल केले आरोपपत्र

100 कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सीबीआयने आज देशमुख यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

सीबीआयच्या ताब्यात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आता आणखी भर पडली आहे. 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. अनिल देशमुखांसह अन्य दोन आरोपींविरोधात अवघ्या 59 पानांचं आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात सीबीआयने देशमुखांवर गंभीर आरोप केले आहे. या प्रकरणी लवकरच सुनावणी होणार आहे.

5 स्लिप, एक गली आणि विकेट कीपर, इंग्लंडने 2 तासात लावली न्यूझीलंडची वाट!

आयपीएल 2022 संपल्यानंतर जगभरात वनडे आणि टेस्ट क्रिकेटचा रोमांच सुरू झाला आहे. जून महिन्यातली पहिली टेस्ट इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वात मैदानात उतरलेल्या इंग्लंडने न्यूझीलंडला पहिल्या सत्रातच बॅकफूटवर टाकलं. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण 12 रनमध्येच न्यूझीलंडचे 4 खेळाडू आऊट झाले. 22 ओव्हरचा खेळ झाला तेव्हा न्यूझीलंडचा स्कोअर 37/6 असा झाला.

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातली टेस्ट लॉर्ड्सच्या ऐतिसाहिक मैदानात होत आहे. इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसनने न्यूझीलंडचे दोन्ही ओपनर विल यंग आणि टॉम लेथम यांना स्लिपमध्ये उभ्या असलेल्या जॉनी बेयरस्टोकरवी कॅच आऊट केलं. हे दोन्ही बॅटर एक-एक रन करून आऊट झाले.

मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी राज ठाकरेंचं जनतेला पत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचा आदेश दिला आहे. राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेसाठी एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये लिहिण्यात आलं आहे. हे पत्र मनसे पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. हेच पत्र महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवण्याचे आदेश राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. या पत्रात राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे खाली उतरविण्यासाठी सर्वसामान्यांनी काय करावं, याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.

राजधानी एक्सप्रेस सुटली अन् कोब्राने घेतला सिग्नल पॅनलचा ताबा

राजस्थानमधील कोटामधून एक विचित्र घटना समोर आली आहे. बुधवारी रेल्वेच्या सिग्नल पॅनलवर 5 फूट लांबीचा कोब्रा साप येऊन बसल्यानंतर खळबळ उडाली. ही घटना रावठा रोड रेल्वे स्टेशनची आहे. सिग्नल पॅनलवर कोब्रा सापाला पाहून स्टेशन मास्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. स्टेशन मास्तर तर घाबरुन खुर्चीवर जाऊन उभे राहिले. काही वेळानंतर पॉइंट्समॅनने सापाला तेथून हटवलं आणि सुरक्षितपणे जंगलात सोडलं. यानंतर कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

नाशिकमध्ये कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील कळवण इथं भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. मारुती अल्टो कार आणि ट्रॅक्टरची धडक झाली आहे. या भीषण अपघातात 7 जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

भाई जगताप शिवसेनेवर भडकले, म्हणाले, कोर्टात जाणार, महाविकास आघाडीवर परिणाम होणार?

मुंबई महापालिकेकडून नुकतंच वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. पण या आरक्षण सोडतीवर काँग्रेस नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. याच नाराजीतून काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर निशाणा साधला. “वार्ड पुनर्रचनामधून काही विशिष्ट लोकांचा राजकीय फायदा करण्यात आला आहे. वार्ड पुनर्रचना आणि प्रभाग सोडत ही पुर्वग्रहदुषित. शिवसेनेचा डाव आहे की काँग्रेसला त्रास व्हायला हवा. म्हणून हे केलं जातंय”, असा घणाघात भाई जगताप यांनी केली आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.