धुळ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. धुळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने शहरातील अवैध खाजगी सावकारी करणाऱ्यां विरोधात धडक कारवाई केली आहे. त्याच दरम्यान धुळे शहरातील एलआयसी किंग अशी ओळख असलेल्या राजेंद्र बंब या एलआयसी एजंटच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आङे. या कारवाईत राजेंद्र बंब याच्या घरातून कोट्यवधींची रोकड आणि इतर मालमत्ता जप्त केली आहे.
कोट्यवधींचं घबाड हाती
आर्थिक गुन्हा शाखेसह अन्य पोलिसांच्या पाच पथकांनी घेतलेल्या झडती पोलिसांना राजेंद्र बंब आणि त्यांच्या कुटूंबियांकडे मोठे घबाड सापडले आहे. राजेंद्र बंब आणि त्यांच्या भावाकडून पोलिसांनी 1 कोटी 42 लाख 19 हजार 550 रुपयांची रोकड जप्त केली आहे. तर 46 लाख 22 हजार 378 रुपयांचें दागिने जप्त करण्यात आले आहेत. यासह कोट्यवधी रुपये किमतीच्या मालमत्तेचे कागदपत्रांची पोलिसांना सापडले आहेत.
राजेंद्र बंब हा धुळ्यातील एक मोठा एलआयसी एजंट आहे. त्याला एलआयसी किंग असंही म्हटलं जातं. धुळे शहरात एका बनावट फायनान्स कंपनीच्या नावे कर्ज देऊन राजेंद्र बंब हा अवैधरित्या 24 टक्के दराने वसुली करत असल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. एका पीडिताने या संदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर त्याचा हा कारनामा समोर आला आहे.