आजच्या सामन्यात भारताला विजय मिळवणं आवश्यक

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर इतिहास रचण्याच्या इराद्याने भारतीय संघ दाखल झाला होता. सुरुवातही तशीच दिमाखदार केली होती. पण आता दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रतिष्ठा वाचवण्याचं चॅलेंज भारतासमोर आहे. सेंच्युरियन कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघ या दौऱ्यात सातत्याने पराभवाचा सामना करतोय. कसोटी मालिका 2-1 अशी गमावल्यानंतर आता वनडे मालिकेतही (One day Series) तशीच अवस्था आहे. दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आज सीरीजमधला शेवटचा वनडे सामना आहे. दक्षिण आफ्रिकेला सीरीजमध्ये क्लीन स्वीप विजयापासून रोखण्यासाठी आजच्या सामन्यात भारताला विजय मिळवणं आवश्यक आहे.

जोहान्सबर्ग कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघाने आपला सूर हरवला आहे. विजयासाठी लागणारा तो जोश, चैतन्य, ती उर्मी संघात दिसत नाहीय. दौऱ्याच्या सुरुवातीपासून फलंदाजी भारताची मुख्य अडचण ठरली आहे. प्रत्येक सामन्यात एखाद-दुसऱा फलंदाज चालतोय. सांघिक कामगिरी होत नाहीय. कसोटी मालिकेत गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली होती. पण त्याच गोलंदाजांना आता वनडे मध्ये विकेट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.

पहिल्या दोन वनडेमध्ये भारतीय गोलंदाजी निष्प्रभ ठरली. भारताचा वर्ल्ड क्लास बॉलिंग अटॅक खूपच सामान्य वाटला. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अगदी सहज आरामात धावा काढल्या. खरंतर दक्षिण आफ्रिकेचा हा संघ अनुभवामध्ये भारतापेक्षा खूपच मागे आहे. पण तरीही त्यांनी कसोटी आणि वनडे मालिका जिंकली. रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने केएल राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पण कर्णधार म्हणून जी हुशारी दिसली पाहिजे, ती त्याच्यामध्ये दिसलेली नाही. पहिल्या वनडेमध्ये वेंकटेश अय्यरचा संघात ऑलराऊंडर म्हणून समावेश केला. पण त्याला एक षटकही गोलंदाजी दिली नाही. त्याऐवजी ऋतुराज गायकवाड सारख्या स्पेशलिस्ट फलंदाजाला संधी द्यायला हवी होती.

केपटाऊनमध्ये काय घडणार? दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयी हॅट्ट्रिक साधणार ? हे जाणून घेण्यासाठी न्यूलँडसच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वनडे सामन्यांचा इतिहास जाणून घेणं आवश्यक आहे. दोन्ही संघांमध्ये केपटाऊनमध्ये आतापर्यंत चार सामने झाले आहेत. या चार वनडेमध्ये दोन वनडे भारताने आणि दोन दक्षिण आफ्रिकेने जिंकल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.