आज दि.१९ एप्रिल च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

धनूभाऊंचं पंकजाताईंना रिटर्न गिफ्ट, बीडकरही झाले अवाक!

बीडच्या परळी येथील जवाहर शिक्षण संस्थेच्या निवडणूकीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या अगोदर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचीदेखील या शिक्षण संस्थेवर बिनविरोध सभासद म्हणून निवड झाली आहे. शिक्षण संस्थेच्या निवडणुकीमध्ये बहीण-भावांची दिलजमाई झाल्याचं स्पष्ट झाले आहे.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. या गटात उमेदवारी अर्ज दाखल केलेले सदाशिव आप्पा मुंडे यांचे नातेवाईक बालाजी गिते यांनी माघार घेतली आहे, यामुळे पंकजा मुंडे बिनविरोध निवडून आल्या आहेत.

राज्याच्या नागरिकांना उकाड्यापासून दिलासा, हवामान खात्याची गूड न्यूज!

मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील तापमानामध्ये कमालीची वाढ झाली आहे, त्यामुळे नागरिक उकाड्यापासून हैराण झाले आहेत. पण पुढच्या चार दिवसांमध्ये नागरिकांना दिलासा मिळणार आहे. संपूर्ण राज्यातील कमाल तापमानात उद्यापासून पुढचे 4 दिवस घट होणार आहे.राज्यभरातलं तापमान पुढच्या चार दिवसांमध्ये कमी होईल, अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉ.के.एस होसाळीकर यांनी दिली आहे.

पुणेकरांना मोठा दिलासा, मालमत्ता कराबद्दल शिंदे सरकारने घेता मोठा निर्णय

पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे-फडणवीस सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता करात 40 टक्के सवलत पुन्हा लागू करण्यात आली आहे. 01 एप्रिल, 2023 पासून 40 टक्के मालमत्ता कर सवलत निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. 31 मार्च, 2023 पर्यंतच्या फरकाच्या रकमेची वसुली माफ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

अजित पवारांनी बोलावली आमदारांची बैठक; राष्ट्रवादीच्या गोटात वेगवान हालचाली

गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र मंगळवारी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या वतीनं आयोजित इफ्तार पार्टीला देखील हजेरी लावली. मात्र आज  राष्ट्रवादीच्या गोटात वेगवान हालचाली घडताना दिसत आहेत.अजित पवार यांनी त्यांचे निवासस्थान असलेल्या देवगिरीवर पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीमधील दिग्गज नेते उपस्थित आहेत. अजित पवार यांनी बैठक बोलावल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

सतीश कौशिकनंतर आणखी एका अभिनेत्याचं कार्डियक अरेस्टनं निधन

मागील वर्षभरात बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांचं हार्ट अटॅकनं निधन झालं. गायक केके, सिद्धार्थ शुक्ला, राजू श्रीवास्तव, पुनीत राजकुमार सारख्या हरहुन्नरी कलाकारांचा हार्ट अटॅकनं दुर्देवी मृत्यू झाला.  काही दिवसांआधीच अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी ताजी असताना आता सिनेसृष्टीतील आणखी एका कलाकाराचं हार्ट अटॅकनं निधन झालं आहे.  ही बातमी साऊथ सिनेसृष्टीतून आहे. साऊथ अभिनेता अल्लू रमेश यांचं हार्ट अटॅकनं निधन झालं.  ते 52 वर्षांचे होते. रमेश यांच्या निधनानं तेलुगु सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

साखर कारखान्यांना ‘मार्जिन मनी लोन’ देण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून (NCDC) महाराष्ट्र शासनामार्फत ‘मार्जिन मनी लोन’ मंजूर करण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात रामदास आठवलेंना हवंय एक मंत्रीपद 

गेल्या काही महिन्यांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. यासंदर्भात सरकारकडून अनेकदा लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल असं सांगण्यात आलं असलं, तरी अद्याप त्याला मुहूर्त लागलेला नाही. त्यातच बच्चू कडू हे अपक्ष आमदार जाहीरपणे मंत्रीमंडळ विस्तार इतक्यात होणार नसल्याची भूमिका मांडत आहेत. त्यामुळे राज्य मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कमालीची अनिश्चितता असताना रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात रिपाइंला स्थान मिळावं, अशी मागणी केली आहे.रामदास आठवले यांनी नुकतीच जनसत्ताला एक मुलाखत दिली असून त्यामध्ये विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बाबतीत आपण समाधानी असल्याचं मत मांडलं आहे. “नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसींचे अनेक मंत्री आहेत. मोदींनी सर्व वर्गांना न्याय देण्याचं काम केलं आहे”, असं म्हणत रामदास आठवलेंनी काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या काळातली आठवण सांगितली.

उमेदवारी अर्ज भरण्याकरता आणली १ रुपयाची १० हजार नाणी, चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांची दमछाक

अभिनेता मकरंद अनासपुरे यांचा गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा या मराठी चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. या चित्रपटात उमेदवारी अर्ज भरण्याकरता मकरंद अनासपुरे यांनी चिल्लर आणली होती. आता असाच प्रकार कर्नाटकात घडला आहे. कर्नाटकात निवडणुकांची धामधूम सुरू आहे. विविध पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर झाल्या असून उमेदवारी अर्ज भरण्याचीही प्रक्रिया होत आहे. यातच, एका यादगीर मतदारसंघातून अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरला आहे. परंतु, त्याने हटकेपद्धतीने हा उमेदवारी अर्ज भरला असून त्याने चक्क एक एक रुपयांची चिल्लर जमा केली आहे.“मी माझं आयुष्य माझ्या समाज आणि गावासाठी समर्पित करतोय. स्वामी विवेकानंदा यांचे विचार असलेले एक फलक घेऊन मी आज अर्ज भरण्यासाठी येथे आलो आहे”, असं अपक्ष उमेदवार यांकप्पा यांनी म्हटलं. यांकप्पा यांनी लोकवर्गणीतून १० हजार रुपये गोळा केले आहेत. एक-एक रुपयांचे नाणे जमा करून त्यांना १० हजारांचा निधी गोळा केला. हेच १० हजार रुपये त्यांनी आज कार्यालयात दिले.

जगातील ‘या’ सर्वात श्रीमंत शहरात आहेत तब्बल तीन लाख ४० हजार लखपती, करोडपती

जगातील श्रीमंतांची संख्या वाढत आहे. परदेशात तर हा आकडा सातत्याने वाढतोय. एका अहवालानुसार, २०२३ मध्ये सर्वाधिक लक्षाधीशांसह न्यूयॉर्कने पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत शहराता बहुमान पटकावला आहे. जगातील सर्वात श्रीमंत शहरांविषयीचा अहवाल ग्लोबल वेल्थ ट्रॅकर हेन्ली अँड पार्टनर्स’ या संस्थेने तयार केला आहे. अहवालानुसार, एकट्या न्यूयॉर्क शहरात ३ लाख ४०,००० करोडपती आहेत.न्यूयॉर्कनंतर टोकियो आणि सॅन फ्रान्सिस्को बे शहरात अनुक्रमे दोन लाख ९०३०० आणि दोन लाख ८५००० रहिवासी लोकसंख्या ही करोडपती आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.