आज दि,१८ एप्रिल च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

वाशिमच्या सुपूत्राला आलं वीरमरण, पॅरा कमांडो अमोल गोरे अरुणाचल प्रदेशमध्ये शहीद

भारतीय सैन्य दलात पॅरा कमांडो म्हणून कार्यरत असलेले वाशिम जिल्ह्याचे सुपूत्र अमोल गोरे हे भारत चिन सीमेवर अरुणाचल प्रदेश येथे बचाव कार्य करीत असताना शहीद झाले आहेत. भारत चीन सीमेवरील अरुणाचल प्रदेश कामेंग येथे बचाव कार्यादरम्यान, दोन जवानांना वाचवताना त्यांना वीरमरण आलं आहे.  त्यांच्यावर उद्या 19 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 11 चे दरम्यान वाशिम जिल्ह्यातील सोनखास या त्यांच्या मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

चर्चा थांबल्या, दादा आले! राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीत अजित पवारांची एण्ट्री

मागच्या काही दिवसांपासून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. एवढच नाही तर अजितदादा राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत भाजपसोबत जातील, असं बोललं गेलं. सोमवारी पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात शरद पवार, सुप्रिया सुळे होत्या, तिथेही अजित पवार गेले नाहीत, त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं. अखेर मीडियासमोर येत अजित पवारांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

आपण राष्ट्रवादीसोबतच असल्याचं सांगितल्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या इफ्तार पार्टीत सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई विभागाच्या इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमाला अजित पवार आले आहेत. या कार्यक्रमाला शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज सहभागी होत आहेत.

धुळ्यात एका ठिणगीने मेणबत्ती कारखान्याला आग; चौघींचा होरपळून मृत्यू

काही महिन्यांपूर्वी सोलापूरमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग लागून मोठी घटना घडली होती. अशीच घटना आता धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या निजामपूर गावाजवळ असलेल्या चिखलीपाडा शिवारात घडली. येथे एका मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दोन महिला गंभीररित्या भाजल्या आहेत.

एकदोन नाही तर साडेचारशे होर्डिंग.. रावेतमधील अपघातानंतर धक्कादायक माहिती समोर

सोमवारी पिंपरी चिंचवड शहरात रस्त्याच्या कडेला उभारलेलं होर्डिंग कोसळून त्याखाली चिरडल्या गेल्याने पाच नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. हे उभारल्या गेलेलं होर्डिंग अनाधिकृत असल्याची बाब स्पष्ट झाल्याने महानगरपालिका प्रशासन आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणानेच सामान्य नागरिकांचा बळी घेतल्याची बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.सुनियोजित शहर अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात उभारण्यात आलेल्या अशा मोठमोठ्या होर्डिंगपैकी तब्बल साडेचारशे होर्डिंग अनाधिकृत असल्याची माहिती आता समोर आली आहे. अशाच पद्धतीने कोणतीही परवानगी न घेता उभारल्या गेलेल्या हे  कित्येक टन वजनाचे होर्डिंग वादळाचा तडाख्याने  कोसळलं आणि त्याखाली उभ्या असलेल्या पाच नागरिकांचा नाहक बळी गेला. घटनेची प्राथमिक चौकशी झाली आणि पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत घटनेसाठी जबाबदार असल्याचा ठपका ठेवत तीन जणांविरुद्ध सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल केले.

पुण्यातील शाळेतून दहशतवादी प्रशिक्षण, NIAने दोन मजले केले सील

पुण्यात एका शाळेचे दोन मजले सील करून पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. एनआयला अशी माहिती मिळाली होती की, पुण्यातल्या अश्रफनगर रोड भागातील ब्यू बेल शाळेत दहशतवादी कारवाया सुरू आहेत. पीएफआय या संघटनेकडून दहशतवादी कारवायांसाठी इथं प्रशिक्षण दिलं जात असल्याचा आरोप आहे. या संशयावरूनच एनआयएकडून शाळेचे दोन्ही मजले सील करण्यात आले आहेत.

एनआयएने रविवारी ही कारवाई केली. यामध्ये ब्यू बेल शाळेचा चौथा आणि पाचवा मजला सील केला आहे. दहशतवादी कारवायांच्या तयारीसाठी पीएफआयकडून या मजल्याचा वापर केला जात असल्याचा ठपका एनआयएने ठेवला आहे. पीएफआयकडून मुस्लिम तरुणांची भरती केली जात होती आणि २०४७ पर्यंत इस्लामिक राजवट स्थापन करण्यास विरोध करतात त्यांच्याविरोधात कारवायांसाठी प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येत होतं असा दावा एनआयएकडून करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात वादळी पावसाचे पुन्हा सर्जीकल स्ट्राईक, कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र

महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाने बहुतांश जिल्ह्यात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान गारपीट आणि वादळी पावसाचा पुन्हा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दिवसभर उन्हाचा तडाखा आणि संध्याकाळी अचानक वादळी आणि गारपिटीचा पाऊस होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात पुन्हा गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. काही भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात पुढच्या 24 तासांत उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या कमाल तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यात कोकणातील पालघरमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

IPL मधील जुळे भाऊ एकमेकांविरुद्ध उतरणार मैदानात, आयपीएलच्या इतिहासात प्रथमच होणार असा मुकाबला

आयपीएल 2023 मधील 25 वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना होणार असून यात दोन्ही संघ विजयाची हॅट्रिक घेण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. परंतु या सामन्यात जुळे भाऊ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार असून आयपीएलच्या इतिहासात असे प्रथमच घडणार आहे.दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटर मार्को जॅनसेन आणि दुआन जॅनसेन ही दोन्ही भावंडं यंदा आयपीएल 2023 मध्ये खेळत आहेत. मार्को जॅनसेन याला सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल ऑक्शनमध्ये 4.20 कोटी रुपयांना खरेदी केले. तर दुआन जॅनसेनला मुंबई इंडियन्स ने 20 लाखांना खरेदी केले होते. काही दिवसांपूर्वी दुआन जॅनसेनने मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यासामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.

सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारलं

बिल्किस बानो सामुहिक बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांची गेल्या वर्षी पॅरोलवर मुक्तता करण्यात आली. गुजरात सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे पडसात देशभर उमटल्याचं पाहायला मिळालं. बिल्किस बानो सामुहिक बलात्कार प्रकरणातील एकूण ११ गुन्हेगारांना शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, गुजरात सरकारने ही शिक्षा पूर्ण होण्याआधीच या गुन्हेगारांना १५ ऑगस्ट २०२२ रोजी पॅरोलवर सोडलं. गुजरात सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायालयाने गुजरात सरकारला फैलावर घेतलं.

चीनचा ज्या मठावर डोळा, त्याच गावात बौद्ध नेत्यांचं संमेलन

अरुणाचल प्रदेशच्या ११ गावांचं नामकरण करण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात आला होता. यावरून भारत आणि चीन यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. चीनला नामोहरण करण्याकरता भारताकडून विविध उपाय आखले जात आहेत. याकरता जी-२० ची बैठकही लेह येथे आयोजित करण्यात आली. आता, अरुणाचल प्रदेशच्या तवांग येथे हिमालयी क्षेत्रात वरिष्ठ बौद्ध नेत्यांचं राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या संम्मेलनात मुख्यमंत्री पेमा खांडू सुद्धा उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे चीनचा ज्या मठावर डोळा आहे त्याच गावात हे संमेलन आयोजित करण्यात आल्याने भारताने चीनला सूचक इशारा दिला आहे, असं म्हटलं जात आहे.

यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर, आशा भोसले ठरल्या मानकरी

यंदाच्या ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले या यंदा पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. त्याबरोबरच विद्या बालन, पंकज उदास, प्रसाद ओक यांच्यासह अनेकांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गायिका उषा मंगेशकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८१ व्या स्मृतिदिनानिमित्त नुकतंच एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले. या प्रसिद्धीपत्रकामध्ये या पुरस्काराविषयी माहिती देण्यात आली. यानुसार यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे. तर चित्रपट आणि नाटक क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेता प्रसाद ओकला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेत्री विद्या बालनचा विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.

‘पंतप्रधान सौरऊर्जा योजने’तून ४८ नाट्यृहांना मदत करावी; प्रशांत दामले यांची केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी

नाट्यगृह उभारणे सोप्पे आहे; परंतु त्याची देखभाल करणे अवघड आहे. नाट्यगृहाच्या विज बिलापोटी मोठी रक्कम खर्च करावी लागते. ही बाब विचारात घेऊन पंतप्रधान सौर उर्जा योजनेतून राज्यातील ४८ नाट्यगृहांना मदत करावी, अशी मागणी अभिनेते प्रशांत दामले यांनी केली. यासाठी दामले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांना साकडे घातले आहे.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक रविवारी पार पडली. या निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूह गटा’ने बाजी मारली. या पार्श्वभूमीवर दामले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.नाट्यगृहांचे भाडे कमी करावे अशी मागणी निर्माते सातत्याने मुंबई महानगरपालिकेकडे करीत असतात. या प्रश्नावर कायम स्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे. केंद्र आणि राज्य सरकारने नाट्यसृष्टीला मदतीचा हात दिल्यास दिलासा मिळू शकेल, असा आशावाद दामले यांनी व्यक्त केला.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.