मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय
गप्प बसणार नाही : संभाजीराजे
शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमानंतर संभाजीराजे भोसले यांनी आपली भूमिका मांडली आहे. “आत्तापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला. हो आहे मी संयमी. पण इथून पुढे तुम्ही माझा संयम पाहणार नाहीत. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल. म्हणून आम्ही ठरवलंय की आंदोलन हे निश्चित आहे”, अशा शब्दांत संभाजीराजे भोसले यांनी सरकारला सुनावलं आहे. यावेळी येत्या १६ जूनला पहिला मोर्चा काढण्याचा इशारा खासदार संभाजीराजे भोसले यांनी दिला आहे. पहिल्या टप्प्यात लोकप्रतिनिधींची जबाबदारी असून सामान्य मराठा जनतेनं रस्त्यावर येऊ नये, असं देखील ते म्हणाले.
मुंबई हादरली, अल्पवयीन मुलीवर
तीन ठिकाणी सामूहिक बलात्कार
महिलांवरील अत्याचारांबद्दल चिंता व्यक्त होत असतानाच मुंबईत एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर इन्स्टाग्रावर भेटलेल्या मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ‘इन्स्टा’वरील मित्रांनी वाढदिवसांच्या निमित्ताने बोलावून घेतलं आणि सहा जणांनी तिच्या मुंबईतील तीन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
जन्मानंतर बाळाला करोनाचा
संसर्ग, मृत्यूशी झुंज संपली
शहरात माणसं बेड आणि वेळेत उपचार न मिळाल्याने जीवाला मुकली. तिथे पाडे-वस्त्यांची अवस्था काय असेल याबद्दल न बोललेचं बरं… हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे पालघर जिल्ह्यात घडलेली घटना. जन्माला आल्यानंतर उपचारासाठी वणवण सोसावी लागली. जन्मानंतर बाळाला करोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं. स्थानिक ठिकाणी रुग्णालय नसल्याने त्याला पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे पुरेशा आरोग्य सुविधा नसल्यानं पुन्हा अनेक तासांचा प्रवास या चिमुकल्याला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं. पण, सहा दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज संपली…. महाराष्ट्राच्या काळजाला चटका लावणारी ही नाशिक जिल्हा रुग्णालयात घडली.
मी त्या दिवशीच राजीनामा
देईल : येडीयुरप्पा
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. कर्नाटकात भाजपात सर्वकाही अलबेल नसल्याचं सध्या चित्र आहे. मात्र या सर्व बातम्यांना मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे. “भाजपा नेतृत्वाने मला पद सोडण्यास सांगितल्यास मी त्या दिवशीच राजीनामा देईल.” असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र असं असलं तरी दुसरा पर्याय नसल्याचं सांगायला विसरले नाहीत. तर दुसरीकडे येडीयुरप्पा समर्थक आमदारांनी मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील आणि पुढची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल असंही सांगितलं.
ब्लू टिकसाठी मोदी सरकार भांडत आहे,
तुम्ही आत्मनिर्भर व्हा : राहुल गांधी
देशात करोनासाठीच्या लसींचा तुटवडा असताना केंद्र सरकार मात्र ट्विटरच्या मागे लागले असल्याची टीका राहुल गांधींनी केली आहे. “ब्लू टिकसाठी मोदी सरकार भांडत आहे, कोविडची लस हवी असेल, तर आत्मनिर्भर व्हा”, असं सूचक आणि खोचक ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे. तसेच, या ट्वीटसोबत #Priorities देखील लिहिलं आहे. करोनाच्या संकटकाळात लसींचा तुटवडा असताना मोदी सरकार मात्र ट्विटरच्या ब्लू टिकला प्राधान्य देत असल्याची खोचक टीका त्यांनी केली.
दिल्लीकरांना तात्पुरता
का होईना दिलासा
दिल्लीत गेल्या काही दिवसात करोना रुग्णांच्या संख्या झपाट्याने कमी होत आहे. दिल्लीत रविवारी ३८१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली . १५ मार्चनंतर सर्वात कमी रुग्ण संख्या नोंदवली गेली आहे. तर एका दिवसात ३४ जणांना करोनामुळे मृत्यू झाला आहे. दिल्लीत सुद्धा ४१४ करोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर ६० जणांचा मृत्यू झाला होता. करोना रुग्णवाढीचा दर ०.५ टक्क्यांच्या खाली आहे. दिल्लीकरांना तात्पुरता का होईना दिलासा मिळाला आहे.
मेहुल चोक्सी म्हणतो, मी कायदा पाळणारा माणूस
पंजाब नॅशनल बँकेत १३५०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या हिरे व्यापारी मेहुल चोक्सी डोमिनिकामध्ये अटक करण्यात आल्यानंतर आता भारतात प्रत्यार्पण होणार की नाही याकडे सध्या सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान डोमिनिकामधील हायकोर्टात मेहुल चोक्सीने केलेल्या याचिकेवरील सुनावणी गुरुवारपर्यंत स्थगित झाली आहे. त्यावर मेहुल चोक्सीने प्रतिज्ञापत्रात दावा केला आहे की तो “कायदा पाळणारा नागरिक” आहे आणि त्याने केवळ वैद्यकीय उपचारासाठी भारत सोडला आहे.
पूर्व लडाखमध्ये
चीनचे सैन्य माघारी
पूर्व लडाखमध्ये सीमावाद सुरु झाल्यापासून चीनची पीपल्स लिबरेशन आर्मीने मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले होते. त्यानंतर तिथल्या थंडीमुळे सैन्य मागे बोलवण्यात आलं आहे. लडाख परिसरातील वाढत्या थंडीमुळे पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ९० टक्के सैनिकांना परत पाठवले आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते मे या कालावधीनंतर चीनने लडाखच्या पूर्वेकडील भारतीय हद्दीजवळ जवळपास ५०,००० सैन्य तैनात केले होते.
कराड परिसरात मुसळधार
पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर
सातारा तालुक्यासह महाबळेश्वर, पाचगणी, वाई, जावली, कराड परिसरात सायंकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मांडवे (ता.सातारा) गावात मात्र ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले. अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे या परिसरातील ओढ्या नाल्यांना पूर आल्याने सर्व विहरी भरून वाहून लागल्या. गावात सर्व मार्गांवर पाणी वाहत असल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळालं. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचेही वातावरण निर्माण झाले आहे.
महागाई भत्ता 17 टक्क्याऐवजी
आता 28 टक्के मिळणार
जवळपास दीड वर्षापासून रखडलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता येत्या जुलै महिन्यात मिळण्याची चिन्हं आहेत. हा भत्ता 17 टक्क्याऐवजी आता 28 टक्के मिळणार आहे. कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखला होता. सरकारने 1 जानेवारी 2020 आणि 1 जुलै 2020 हे दोन्ही महागाई भत्ते दिले नाहीत. त्यात यावर्षाचीही भर पडली. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दुहेरी नुकसानीला सामोरं जावं लागलं.
मुकेश अंबानींना एका दिवसात
34 हजार कोटी रुपयांचा नफा
कोरोना काळात उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या माध्यमातून आपला व्यवसाय चांगलाच वाढवला. खूप कमी वेळेत हा डिजीटल व्यवसाय मोठा नफा देणारा ठरला. असं असलं तरी रिलायन्सचा सर्वात जुना व्यवसाय हा पेट्रोकेमिकलचा आहे. पेट्रोलियम व्यवसायात अंबानींकडून मागील काही वर्षांत फार मोठी घोषणा झाली नाही. असं असलं तरी पेट्रोलियम व्यवसायाबाबत सौदी आरामकोसोबतच्या भागीदारीची चर्चा अद्याप संपलेली नाही. आता मुकेश अंबानींना एका दिवसात तब्बल 34 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचा नफा झाला आहे.
पुणे शहरात सोमवारपासून
अनलॉकची प्रक्रिया
पुणे शहरात सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार आहे. शहरातील दैनंदिन स्वरुपाच्या जवळपास सर्व व्यवहारांना मुभा मिळणार आहे. दुपारी चार वाजेपर्यंत सर्व व्यवहार सुरु ठेवता येणार असले, तरी संध्याकाळी पाचनंतर मात्र जमावबंदी आणि संचारबंदीचा आदेश लागू असेल. पुणेकरांना आता जिल्हाबंदी नसून ते आवश्यक ठिकाणी ई-पासशिवाय प्रवास करु शकतील.
SD social media
9850 60 3590