पेगाससच्या (Pegasus) मुद्द्यावरून दिल्लीचं राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे. अमेरिकेच्या ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने पेगाससच्या खरेदीची बातमी छापल्याने भारताच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. या प्रकरणी केंद्र सरकारने तात्काळ खुलासा करावा अशी मागणी काँग्रेसने (congress) केली आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणावर खुलासा करावा, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. तर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
मोदी सरकारने देशद्रोह केला आहे, अशी टीकाच राहुल गांधी यांनी केली आहे. देशात पाच राज्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर विरोधकांच्या हातात पेगाससचं आयतं कोलित मिळाल्याने भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करून हल्ला चढवला आहे. मोदी सरकारने आपल्या लोकशाहीतील प्राथमिक संस्था, राजकीय नेते आणि जनतेची हेरगिरी करण्यासाठी पेगाससची खरेदी केली होती. विरोधक, न्यायपालिका आणि लष्कराचे फोन टॅप करून सर्वांना टार्गेट केलं. हा देशद्रोह आहे. मोदी सरकारने देशद्रोह केला आहे, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही ट्विट केलं आहे. मोदी सरकारने भारताच्या शत्रू सारखं काम का केलं? भारतीय नागरिकांच्या विरोधातच युद्धाच्या शस्त्रांचा वापर का केला? पेगाससचा वापर बेकायदेशीरपणे हेरगिरी करण्यासाठी करणं हा राष्ट्रद्रोह आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. सर्वांना न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे, असं खरगे यांनी म्हटलं आहे.
मोदी सरकारने न्यूयॉर्क टाइम्सच्या खुलाश्यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे. इस्रायलची कंपनी एनएसओने 300 कोटीला पेगाससची विक्री केली. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालय आणि संसदेची दिशाभूल केल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसून येतं. हे वॉटरगेट आहे का? असा सवाल भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.