शिवसेनेत अंतर्गत मतभेद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषद निवडणुकीत ही शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे आणि सीएम उद्धव ठाकरे यांच्यातील मतभेदाची उघडपणे चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. दुसरीकडे आमदारांमध्येही नेतृत्त्वाबाबत नाराजी असल्याचं बोललं जात आहे. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त समोर आलं आहे.
मुंबईत बोलवूनही नेतृत्वानं आमदारांची भेट न घेतल्याने आमदारांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे शिवसेनेत कोणतेही अंतर्गत मतभेद नसल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर या मतभेदामुळे शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपकडून आमदारांची पळवापळवी होण्याची भीती असल्याने महाविकास आघाडीला आपल्या आमदारांवर बारीक नजर ठेवून आहे.
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जूनला मतदान होणार आहे. गुप्त मतदान होणार असल्यामुळे आमदार कोणाच्या संपर्कात आहेत, याची माहिती गुप्तपणे घेतली जात आहे. शिवसेनेच्या आमदारांना तर माध्यमांशी बोलण्यासही मनाई करण्यात आली.