रक्तदान करण्यास प्रेरणा देण्यासाठी आणि नियमित रक्तदात्यांचे आभार मानण्यासाठी दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. साईबाबांच्या शिर्डीत देखील वर्षाकाठी साधारण 15 हजार रक्तबॅगचे संकलन केले जाते. यात साई मंदिर परिसरात रक्त संकलन केंद्राच्या माध्यमातून ऐच्छिक भाविक रक्तदात्यांकडून रक्तदान स्वीकारले जाते. रक्त हा शरीरातील असा घटक आहे. ज्याला प्रत्यक्षात मनुष्याची गरज पडते. हेच लक्षात घेवून साईबाबा संस्थानच्या वतीनं सोने-चांदी आणि पैशात डोनेशन देणाऱ्या भाविकाप्रमाणे आता रक्तदात्याला व्हीआयपी सुविधा देवून त्याचा सन्मान केला जात आहे.
साईबाबांनी शिर्डीत आपल्या हयातीत आरोग्यसेवा करुन अवघ्या जगाला मानवतेचा संदेश दिला. हाच आरोग्य सेवेचा वसा साईसंस्थान दोन मोठी रुग्णालय चालवत पुढे नेत आहे. या ठिकाणी होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी रक्तदानाची आवश्यकता पडत असे. त्यामुळे साधारण 30 वर्षांपूर्वी साईसंस्थानने श्रीसाईनाथ रक्त केंद्राची उभारणी केली. याठिकाणी सुरुवातीच्या काळात रक्तदान तुरळक होत असे. मात्र अलीकडे रक्तसंकलन मोठ्या प्रमाणात होत आहे.
भाविक होतोय रक्तदाता
श्री साईनाथ रक्त केंद्राबरोबरच साईमंदिरात देखील रक्त संकलन करण्यास सुरुवात केली आहे. तत्कालीन अध्यक्ष सुरेश हावरे यांनी याठिकाणी स्वतंत्र आणि प्रशस्त रक्त संकलन केंद्राची उभारणी केली होती. त्याच बरोबर आता साईमंदिरातील दर्शन रांगेलगत भाविकांच्या अगदी सहज दृष्टीस पडेल अशा ठिकाणी रक्त संकलन केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. जे भाविक याठिकाणी रक्तदान करतात त्यांना साईबाबांचे व्हीआयपी दर्शन आणि प्रसाद मोफत दिला जात आहे.
साईसंस्थानचे विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर यांनी याविषयी बोलतांना सांगीतले की, “पूर्वीचे रक्त संकलन केंद्र भाविकांना सहज दृष्टीस पडत नव्हते, त्यामुळे आता दर्शनबारी लगतच ही व्यवस्था करण्यात आली आहे. येथे फक्त श्रीमंतच भाविक येतो असे मुळीच नाही. सामान्य भाविकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे त्यांना बाबांच्या झोळीत काही दान टाकण्याची इच्छा असते. असे भाविक येथे अवर्जून रक्तदान करतात. साईमंदिरात 25 हजारांपेक्षा आधिक दान देण्याऱ्या व्यक्तीला व्हीआयपी सुविधा दिली जाते. तीच सुविधा रक्तदात्याला दिली जात असून यापुढे अशीच कायम असणार आहे. रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र, बुंदीचा लाडू प्रसाद, साईंची उदी आणि व्हीआयपी साईदर्शन अशी व्यवस्था साईसंस्थान करत आहे. रक्ताची किंमत होवू शकत नाही मात्र रक्तदान जनजागृती साठी संस्थानकडून हा सकारात्मक प्रयत्न केला जात आहे.”