अनेकवेळा आपल्या मोबाइलचा नेटवर्क गेल्याचा घटना समोर येतात. त्याला कारणीभूत काही तांत्रिक अडचणी असतात. मात्र आता मोबाईलचा नेटवर्क जाण्याचं एक नवीन कारण समोर आलं आहे. ठाण्यातील कापूरबावडी पोलिसांनी मोबाईल टॉवरचे कार्ड चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल टॉवरमध्ये ए.बी.आए.ए कार्ड हे नेटवर्क जोडण्याचे काम करत असते. हे कार्ड चोरल्याने आपोआपच मोबाईलचे नेटवर्क गायब होते. या कार्डमध्ये प्लॅटिनम हा महागडा धातू असतो. हा धातू काढून बाकीचे सामान चोरटे भंगारात विकत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
या प्रकारात मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आहे. याबाबत पोलिस कसून चौकशी करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 7 लाख 20 हजार किंमतीचे इलेक्ट्रॉनिक सर्किट असलेले 14 ए.बी.आय.ए कार्ड तसेच इलेक्ट्रॉनिक सर्किट असलेले मोबाईल टॉवर लिंक कनेक्टिविटी करीता वापरण्यात येणारे बेसबॅण्ड युनिट एकूण 8 नग असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत अधिक तपास कापूरबावडी पोलीस करत आहेत.