मेघालय आणि पश्चिम बंगालसह पूर्वोत्तर राज्यांना आज सकाळी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के बसले. एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के जाणवल्याने येथील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सकाळी सातच्या सुमारास सर्वात मोठा झटका बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 नोंदवली गेली. आसाममध्ये तर इमारतींनाही तडे गेले. अनेक घर आणि प्लॅटमधील भिंतीचे प्लास्टर कोसळून पडले. घरातील भांडीकुंडीही जमिनीवर आदळल्याने येथील प्रचंड घाबरून गेले आहेत. आज झालेल्या जोरदार भूकंपांमुळे पूर्वोत्तर राज्यातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
आसामसह पूर्वोत्तर राज्यात आज सकाळी 10 मिनिटांच्या अंतराने दोन भूकंपाचे झटके बसले. भूकंपाचा पहिला झटका सकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 एवढी नोंदवली गेली. त्यानंतर लेगचंच सात मिनिटांनी म्हणजे 7. 58 मिनिटांनी भूकंपाचा दुसरा झटका बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.3 एवढी नोंदवली गेली. त्यानंतर तीन मिनिटांनी पुन्हा तिसरा भूकंपचा धक्का जाणवला. 8 वाजून एक मिनिटाने भूकंपचा तिसरा झटका बसला. याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.4 एवढी नोंदवली गेली. दहा मिनिटातच भूकंपाचे लागोपाठ तीन झटके बसल्याने पूर्वोत्तर राज्यातील नागरिक प्रचंड हादरून गेले.
सोनितपूर जिल्हा मुख्यालय तेजपूर, गुवाहाटी आणि आसाममधील अनेक जिल्ह्यातील इमारतींना भूकंपामुळे तडे गेले. भिंतीचं प्लास्टर कोसळलं. काही क्षण जमीन हलल्याने घरातील भिंतीवरील सामान अचानक कोसळले. तसेच घराजवळच्या भिंती कोसळून पडल्या. अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिक जीव मुठीत घेऊन घराबाहेर पळाले आणि त्यांनी उघड्यावर थांबणं पसंत केलं. मात्र, लागोपाठ तीन भूकंपाचे झटके बसल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भूकंपानंतर कोणीही घरात जाण्यास धजावत नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आसामचे मंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी ट्विट करून या भूकंपाची माहिती दिली आहे. या भूकंपाचे केंद्र बिंदू सोनितपूर जिल्ह्यातील ढेकियाजुली येथे असल्याचं त्यांनी सांगितलं. सरमा यांनी भूकंपाचे फोटोही शेअर केले आहेत. त्यावरून हा भूकंप किती जोरदार होता याचा अंदाज येतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेनंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून परिस्थितीची माहिती घेतली आहे. तसेच केंद्राकडून सर्वोतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासनही त्यांना दिलं आहे.