शहापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या राईस मिलमधील ऑफिसमध्ये घुसून तांदूळ व्यापारी रमेश अग्रवाल यांच्यावर हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांनी अग्रवाल यांच्यावर एक गोळी झाडली. ती छातीमध्ये उजव्या बाजूला आरपार घुसल्याने अग्रवाल हे गंभीर जखमी झाले आहेत.
रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी बाईकवर बसून तोंडाला काळे मास्क लावून दोन हल्लेखोर आले होते. दोन्ही हल्लेखोरांच्या हातात एक-एक रिव्हॉल्वर होती. अग्रवाल यांच्या बाजूला बसलेल्या त्यांच्या मुलाने चोर-चोर अशी आरडाओरड करताच हल्लेखोर बाहेर निघाले. निघतांना पुन्हा त्यांनी हवेत दुसरी गोळी फायर केली.
ज्या दुचाकीवर बसून हल्लोखोर आले होते, ती तिथेच टाकून कुमार गार्डन हॉलच्या दिशेने त्यांनी पळ काढला. त्यानंतर मुंबई – नाशिक महामार्गाच्या दिशेने पळून जाण्यास ते यशस्वी झाले. हा सर्व प्रकार बाहेर बसलेल्या त्यांच्या वॉचमने बघितला आणि तोही भयभीत झाला.
रमेश अग्रवाल यांना लगेच शहापूरमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या छातीमधील गोळी बाहेर काढण्यात आली. परंतु जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने अग्रवाल यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. दिवसाला लाखो तर महिन्याला कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या रमेश अग्रवाल या तांदूळ विक्रेत्याच्या राईस मिलमधील ऑफिसमध्ये CCTV कॅमरेही बसवलेले नाहीत. त्यामुळे हल्लेखोर कोणत्या दिशेने आले, दिसायला कसे होते याचा पोलिसांना कसलाच थांगपता लागत नाही. त्यामुळे पोलीस तपासात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.