देश संकटात असताना आपण
गप्प कसे बसू शकतो : न्यायालय
देशातील गंभीर करोनास्थितीची स्वत:हून दखल घेतलेल्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राज्यात काय स्थिती आहे यावर उच्च न्यायालये लक्ष देतील असं स्पष्ट करत देश इतक्या मोठ्या संकटातून जात असताना आपण फक्त मूक प्रेक्षक म्हणून बसू शकत नाही असं म्हटलं. राज्यांमध्ये समन्वय साधण्याची आमची भूमिका असेल असं सर्वोच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं आहे.. सर्वोच्च न्यायालयाने सुनाणवीदरम्यान केंद्राला केंद्रीय संसाधनांचा वापर आणि लसींची किंमत या दोन गोष्टी स्पष्ट करण्यास सांगितलं आहे.
पुढील 48 तासात
पावसाचा जोर वाढेल
महाराष्ट्रासह देशभरात उष्णतेने केला असतानाचं अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाचे थैमान सुरु आहे. पुढील 48 तासात पावसाचा जोर आणखी वाढेल, अनेक ठिकाणी वादळी-वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अवकाळीचा शेतपिकाला मोठा तडाखा बसण्याची शक्यता असल्याने देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर पोलीस कॉन्स्टेबलची
माफी मागेल : फडणवीस
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी केलेल्या टीकेला विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्राच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावरुन ज्युलिओ रिबेरो यांनी फडणवीसांवर टीका करताना सत्तेसाठी सैरभेर झाल्याचं म्हटलं होतं. फडणवीसांनीदेखील इंडियन एक्स्प्रेच्या माध्यमातून पत्र लिहित आपली बाजून मांडली आहे. जर मी काही चुकीचं केलं असेल तर पोलीस कॉन्स्टेबलची माफी मागतानाही मी मागे पुढे पाहणार नाही असं यावेळी ते म्हणाले आहेत.
प्रियंका गांधी यांनी लिहिलेले
मुख्यमंत्री योगीना पत्र
उत्तर प्रदेशमध्ये कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. राजधानी लखनऊ, प्रयागराज, कानपूर आणि वाराणसी या जिल्ह्यांमध्ये करोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवून दहा सूचना केल्या आहेत. राज्यातील रूग्णालयांमध्ये निर्माण झालेला ऑक्सिजन व औषध तुटवड्याचा मुद्दा त्यांनी मांडला आहे, शिवाय करोना चाचण्याचे प्रमाण देखील अतिशय कमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राने लसीकरणात
दीड कोटींचा टप्पा ओलांडला
राज्यात एकीकडे दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग वाढत असताना, दुसरीकडे राज्यात सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेने देखील गती घेतल्याचे दिसत आहे. काल राज्याने पाच लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करत विक्रमाची नोंद केली होती. तर, आजच्या लसीकरणामुळे आता महाराष्ट्राने लसीकरणात दीड कोटींचा टप्पा देखील ओलांडला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या पार्श्वभूमीवर ट्विट करून माहिती दिली आहे. एवढ्या मोठ्यासंख्येने लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे, असं टोपेंनी सांगितलं आहे.
विमान चक्क ऑस्ट्रेलियाहून
रिकामंच परतलं
भारतामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये दररोज ३ लाखांहून जास्त करोनाबाधित सापडत आहेत. त्यामुळे जगभरातून चिंता व्यक्त होत असतानाच काही देशांनी भारतातून येणाऱ्या विमानांवर काही दिवसांसाठी बंदी घातली आहे. नुकतीच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी भारतातून येणाऱ्या सर्व प्रवासी विमानांवर १५ मेपर्यंत बंदी घातली आहे. दिल्ली-सिडनी-दिल्ली अशी सेवा देणारं एक विमान चक्क ऑस्ट्रेलियाहून रिकामंच परतलं आहे. फक्त कार्गो घेऊन परतलेल्या या विमानात फक्त क्रू मेंबर्स होते. ऑस्ट्रेलियन प्रशासनाने एकाही प्रवाशाला या विमानाच चढू दिलं नाही!
रिक्षा कार मधून मृतदेह
स्मशानभूमीपर्यंत नेण्याची वेळ
हरयाणामधल्या गुरुग्राममध्ये करोनानं अत्यंत विदारक परिस्थिती निर्माण केली आहे. करोनामुळे होणाऱ्या मृतांना स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी आता रुग्णवाहिका देखील मिळेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना आपल्या आप्तजनांचे मृतदेह रिक्षा, कार अशा मिळेल त्या वाहनाने स्मशानभूमीपर्यंत नेण्याची दुर्दैवी वेळ ओढवली आहे.
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला
कोरोनाची लागण
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला कोरोनाची लागण झाली आहे. तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना छोटा राजनचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याला उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल केले आहे. तब्बल 26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकणी गँगस्टर छोटा राजनसह तिघा जणांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली होती.
पुण्यात स्मशान भूमी फुल्ल,
मोकळ्या मैदानावर अंत्यसंस्कार
कोरोना बळींचा आकडा वाढत असल्याने पुण्यातील सर्वच स्मशानभूमी फुल झाल्या आहेत. स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाच नसल्याने मोकळ्या मैदानात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. रोजच मोठ्या प्रमाणावर मृतदेह स्मशानभूमीत येत आहेत. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नसल्याने मोकळ्या मैदानात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय पुणे पालिकेने घेतला आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी मृतांच्या कुटुंबीयांना तास न् तास ताटकळत राहावं लागणार नाही.
रुग्णांच्या भेटीसाठी गर्दी
करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार
रुग्णांच्या भेटीसाठी गर्दी करणाऱ्या नातेवाईकांना आवरण्यासाठी नाशिक महापालिका आयुक्तांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना जेवण देण्याच्या बहाण्याने किंवा इतर कारणांसाठी नातेवाईक येऊन भेटतात. हेच नातेवाईक शहरात सुपर स्प्रेडर ठरतात. नातेवाईक शहरात फिरत असल्याने कोरोना संसर्ग वाढत असल्याचा निष्कर्ष महापालिकेने काढला आहे. नाशिकमध्ये कोरोना संसर्ग वाढत असून रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.
माजी पंतप्रधान वाजपेयी यांची
भाची करुणा शुक्ला यांचे निधन
देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भाची आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या करुणा शुक्ला यांचे सोमवारी रात्री कोरोनामुळे निधन झाले. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगढच्या रामकृष्ण केअर या रुग्णालयात करुणा शुक्ला यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने करुणा शुक्ला यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे करुणा शुक्ला भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये दाखल झाल्या होत्या.
SD social media
9850 60 3590