रशियाच्या राजधानीत करोनाने
पुन्हा डोकं वर काढलं, लॉकडाऊन लागू
करोनाने संपूर्ण जगात हाहाकार केला आहे. दरम्यान जग या संकटातून काहीस सावरत होत तर करोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. चीननंतर आता रशियाच्या राजधानीत देखील लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. रशियामध्ये गेल्या २४ तासांत ४० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. ही महामारी सुरू झाल्यापासूनची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्याचबरोबर ११५९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुतिन सरकारने मॉस्कोमध्ये ११ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्नाटकमध्ये निवासी शाळेतील
३२ विद्यार्थ्यांना करोनाची लागण
कर्नाटकमध्ये करोनाने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. कोडगू जिल्ह्यातील निवासी शाळेतील ३२ विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये १० मुली आणि २२ मुलांचा समावेश आहे. एका आठवड्यापूर्वी या सर्व विद्यार्थ्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. हे सर्व विद्यार्थी नववी ते १२ वीच्या वर्गातील आहेत.
आंदोलक महिला शेतकऱ्यांना
भरधाव ट्रकने चिरडलं
हरियाणातील बहादूरगडमध्ये गुरुवारी एका भरधाव ट्रकने ६ आंदोलक महिला शेतकऱ्यांना चिरडलं. यात तिघींचा मृत्यू झालाय, तर तीन महिला शेतकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. सकाळी साडे सहा वाजता ही घटना घडली. या महिला झज्जर रोडवरील दुभाजकावर (डिव्हायडर) बसलेल्या होत्या. भरधाव ट्रक अचानक थेट दुभाजकावर चढला आणि महिलांना चिरडलं. या काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ही क्रुरता आणि द्वेष देशाला उद्ध्वस्त करत आहे, असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं.
आर्यन खानसह
तिघांना जामीन मंजूर
मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन दिलाय. या सर्वांना मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात हा जामीन मिळाला. या सुनावणीकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी ‘मन्नतवर’ जाणार हे स्पष्ट झालंय. आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी भारताचे माजी अॕटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे न्यायालयात हजर आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना
क्रांती रेडकर यांनी लिहिले पत्र
आर्यन खान ड्रग्स प्रकरणात एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर आणि त्यांच्या कुटुंबावर विविध आरोप केले आहेत. या गंभीर आरोपांनंतर त्यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला होता. यानंतर आता क्रांतीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. “एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय, तुम्ही योग्य तो न्याय करा,” अशी विनंती क्रांतीने उद्धव ठाकरेंना पत्राद्वारे केली आहे.
वानखेडे यांना अटक करताना
३ दिवसाआधी नोटीस देण्याचा आदेश
आर्यन खान ड्रग्स प्रकरणात एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यामुळे वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत आपल्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झाल्यास त्याचा तपास सीबीआयने करण्याची आणि कठोर करवाईपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती. दरम्यान, समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाने तुर्तास दिलासा दिला आहे. न्यायालयाने समीन वानखेडे यांना अटक करताना ३ दिवसाआधी नोटीस देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे.
कर्णधार विराट कोहलीला
अटक करणार का : नितीन राऊत
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतात अनेक ठिकाणी फटाके फोडण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या नागरिकांवर मानवतावादी आधारावर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई करण्यात येत आहे. देशात जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश अशा अनेक ठिकाणी याप्रकरणी कारवाई करण्यात आली. दरम्यान या कारवाईला आता विरोध होत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने देखील पाकिस्तानी खेळाडूंचे कौतुक केले तर त्याला युएपीए अंतर्गत अटक करणार का?, असा प्रश्न महाराष्ट्र सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे.
संवेदनशील माहिती मलिक, आव्हाड
यांनी उघड केली : रश्मी शुक्ला
फोन टॅपिंगप्रकरणी रश्मी शुक्ला यांना आरोपी बनवण्यात आले नसले तरी त्यांच्याविरोधात महत्त्वाचे तपशील हाती लागले असून त्याअनुषंगाने तपास केला जाऊ शकतो, अशी माहिती राज्य सरकारतर्फे सोमवारी उच्च न्यायालयात मांडण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना संवेदनशील माहिती देवेंद्र फडणवीस नाही, तर नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये उघड केली होती असा दावा रश्मी शुक्ला यांनी केला आहे.
बस दरीत पडल्याने
११ प्रवाशांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमधील दोडा येथे एक बस दरीत पडल्याने ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या १४ जणांपैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच मदत करण्यासाठी बचाव पथक आणि भारतीय लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
तंबाखू प्रमाणे ड्रग वापरायला परवानगी
द्या : काँग्रेसचे खासदार तुलसी
देशातील ज्येष्ठ वकील आणि काँग्रेसचे राज्यसभा खासदार केटीएस तुलसी यांनी ड्रग्जवर अजब विधान केले आहे. देशातील ज्येष्ठ वकील आणि काँग्रेसचे राज्यसभा खासदार केटीएस तुलसी यांनी ड्रग्जवर अजब विधान केले आहे. मादक द्रव्ये जीवनावश्यक असून गुटखा, दारू, तंबाखू यांसारख्या पदार्थांचे सेवन कर भरून केले जात असल्याचे तुलसी म्हणाले.गुटखा-दारू, सिगारेट यांच्यासारखी ड्रग्जनाही सूट देण्यात यावी. ड्रग्ज हे जीवनावश्यक असून त्यामुळे जीवनातील वेदना कमी होतात, त्याचा समतोल वापर केला पाहिजे,
राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचे
बेमुदत उपोषण सुरू, प्रवाशांची गैरसोय
राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून पगारासह विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. नाशिक, मनमाड, पुणे, नागपूर, सोलापूर या ठिकाणी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आंदोलन तीव्र झाल्यास दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. परिवहन मंत्री अनिल परब एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची दखल घेणार का, हे पाहावे लागेल.
5000 किमी पर्यंत मारा करू शकणाऱ्या
अग्नी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढली आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या अग्नी-5 क्षेपणास्त्राची बुधवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. या क्षेपणास्त्राची रेंज 5000 किमी सांगितली जात आहे. आज संध्याकाळी 7.50 वाजता हे क्षेपणास्त्र सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. कोणतेही शस्त्र आधी वापरले जाणार नाही, असे त्यांचे धोरण कायम राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत भारत आपली ताकद वाढवण्यावरच पूर्ण भर देईल. अग्नी 5 क्षेपणास्त्रामुळे भारताची लष्करी ताकद खूप वाढली असल्याचे बोलले जात आहे. चीनपासून पाकिस्तानपर्यंत सर्वजण अस्वस्थ आहेत. या क्षेपणास्त्राच्या खऱ्या रेंजबाबतही दोन्ही देशांमध्ये वाद सुरू आहे.
SD social media
9850 60 3590