आज दि.२६ डिसेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

मध्य प्रदेशातील
पंचायत निवडणुका रद्द

मध्य प्रदेशातील पंचायत निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेशच्या शिवराज सरकारने रविवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंचायत निवडणुका रद्द करण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला जाईल. राज्यपालांकडून मंजुरी मिळाल्यानंतर पंचायत निवडणुकीसाठीचा अध्यादेश काढला जाणार आहे. तर, ओमायक्रॉन या करोनाच्या व्हेरिएंटचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेतला गेल्याचं बोललं जात आहे.

आपली सामूहिक शक्तीच
करोनाला हरवेल : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी मन की बात कार्यक्रमामध्ये देशाला संबोधित केले. या वर्षातील हा शेवटचा कार्यक्रम होता. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मन की बातमध्ये ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्या शौर्याबद्दल सांगितले. त्यांनी ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्या शेवटच्या पत्रावर चर्चा केली. आपले शास्त्रज्ञ ओमायक्रॉन प्रकाराचा अभ्यास करत आहेत. त्यांना रोज नवीन डेटा मिळत आहे, त्यांच्या सूचनांवर काम केले जात आहे. अशा परिस्थितीत, स्वतःची जागरूकता, स्वतःची शिस्त, करोनाच्या या प्रकाराविरूद्ध देशाकडे मोठी शक्ती आहे. केवळ आपली सामूहिक शक्तीच करोनाला हरवेल.

भारताच्या कोविड-१९ लसीला मान्यता
मिळण्याच्या मार्गात अनेक अडथळे

भारताने बनवलेल्या कोविड-१९ लसीला मान्यता मिळण्याच्या मार्गात अनेक अडथळे आले आहेत. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्याला मान्यता मिळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडे तक्रारही करण्यात आली होती अशी प्रतिक्रिया भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमण यांनी दिली आहे. हैदराबादमध्ये रामेनीनी फाउंडेशन पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे
सारथ्य केले महिला चालकाने

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी त्यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती मुळीक या पोलीस दलातील महिला चालकाने केले. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये तृप्ती मुळीक चालकाच्या जागी बसलेल्या दिसत आहेत. तर गाडीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री सतेज पाटील हे दिसत आहे.

अहमदनगर शाळेतील बाधित
विद्यार्थ्यांची संख्या 51 वर

अहमदनगरच्या एका विद्यालयात तब्बल १९ विद्यार्थी करोना पॉझिटीव्ह आढळल्यानं खळबळ उडाली होती. त्यानंतर या विद्यालयातील बाधित विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दोन दिवसांत बाधितांची संख्या तब्बल ५१वर पोहोचली आहे. जवाहर नवोदय विद्यालयात १९ विद्यार्थी करोनाबाधित आढळले होते, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली होती.

आनंद महिंद्रा यांना गाडी देण्यास
दत्तात्रय लोहार यांचा नकार

दत्तात्रय लोहार म्हणाले, “माझी गाडी आनंद महिंद्रा यांना आवडली याचा मला खूप आनंद वाटतो. पण त्यांनी देऊ केलेली गाडी वापरण्याची माझी परिस्थिती नाही.” लोहार यांच्या पत्नी राणी लोहार यांनी देखील आपली भावना व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “ते आम्हाला नवी गाडी देत आहेत, पण त्यांना आमची ही गाडी हवी आहे. पण आम्ही ही गाडी खूप हालाकीच्या परिस्थितीत तयार केलीय. २ वर्षांपासून साहित्य गोळा केलंय. मागील ५-६ महिन्यापासून या गाडीचा वापर सुरू आहे. या गाडीमुळे आमची बचत झाली. ही पहिली लक्ष्मी आहे त्यामुळे आम्हाला ती देऊ वाटत नाही.

अभिनेता सलमान
खानला साप चावला

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला साप चावल्याची घटना घडली आहे. सलमानच्या पनवेलवरील फार्महाऊसवर ही घटना घडली आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी तो पनवेलच्या फार्महाऊसवर गेला असताना ही घटना घडल्याचे समोर आले आहे. सध्या सलमान हा त्याच्या फार्महाऊसवर विश्रांती घेत असल्याचे माहिती समोर आली आहे. सलमान खानचा उद्या वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी तो पनवेलच्या फार्महाऊसवर गेला होता.

भारत- दक्षिण अफ्रिका कसोटी
आजपासून, भारताची फलंदाजी

भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका कसोटी मालिकेला आजपासून सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर सुरूवात झाली आहे. करोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनच्या सावटाखाली ही मालिका होत असून, प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत पहिली कसोटी पार पडत आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरली आहे. विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर, के एल राहुल आणि मयंक अग्रवाल ही सलामीची जोडी देखील मैदानात उतरलेली आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.